Chanakya Niti For Stress Free Life : आजच्या वेगवान जीवनात कठोर मेहनत करूनही आपल्याला यश का मिळत नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. सर्व काही सुरळीत चालू असतानाही अनेकदा मानसिक थकवा आणि अस्वस्थता जाणवते. त्यावर आचार्य चाणक्य सांगितात की, तुमच्या क्षमतेबरोबरचं तुमची संगतही तुमचे यश आणि शांती ठरवते. अनेकदा आयुष्यात सर्व काही योग्य करूनह, लोक चुकीच्या लोकांशी संगत करतात आणि शेवटी स्वतःच दुःखी, अपयशी होतात. त्यामुळे आयुष्यात सुखी, आनंदी राहण्यासाठी कोणत्या प्रकारच्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे जाणून घेऊ…

वाईट संगतीचे धोके

आचार्य चाणक्यांच्या मते, जगात काही माणसे आणि परिस्थिती अशा आहेत, ज्यांचा भार असह्य असतो. एखादी विद्वान किंवा कर्तृत्ववान व्यक्तीसुद्धा जर या तीन गोष्टींमध्ये अडकली, तर तिचा अधःपात निश्चित असतो. चाणक्य नीतीमधील हा श्लोक हे सत्य स्पष्ट करतो:

“मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दुःखितैः सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति॥”

मूर्खांना उपदेश देणे

आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीची कोणाचे समजून घेण्याची इच्छाच नाही, तिला शिकवण्यात किंवा सल्ला देण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवलात, तर त्यात तुमचेच नुकसान आहे. अशा व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणे म्हणजे “म्हशीला बासरी वाजवून दाखवण्यासारखे” आहे.

नकारात्मक जोडीदाराचा भार

आयुष्यात शांती मिळवण्यासाठी योग्य जोडीदार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चाणक्यांच्या मते, जर जोडीदार कठोर, भांडखोर किंवा वाईट चारित्र्याचा असेल, तर त्या व्यक्तीचे आयुष्य नरक बनते. अशा व्यक्तीची जबाबदारी पेलताना किंवा त्यांच्याशी जुळवून घेताना फार अवघड जाते. त्यामुळे आयुष्यातील चांगले क्षण कमी होतात.

नकारात्मक लोक

तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांच्या संगतीत राहणे टाळणे. जे लोक सतत स्वतःच्या दुर्दशेबद्दल तक्रार करतात किंवा विनाकारण प्रत्येक परिस्थितीत चुका काढतात, अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने तुमचा सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन कमी होऊ शकतो.

उत्तम जीवनासाठी महत्वाची शिकवण

चाणक्यांच्या मते, आयुष्यात केवळ बुद्धिमान असणे पुरेसे नाही; आपण आपली ऊर्जा आणि वेळ कुठे गुंतवत आहोत, हेदेखील समजून घेणे आवश्यक आहे. चुकीच्या लोकांना सुधारण्याच्या किंवा त्यांच्याशी जबरदस्तीने नातेसंबंध जोडण्याच्या प्रयत्नात स्वतःला धोक्यात घालू नका.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)