म्हातारपणात सांभाळतील या अपेक्षेने मोठ्या केलेल्या मुलांनीच घराबाहेर काढल्याने हतबल झालेल्या महिलेकडे जेव्हा महिला अधिकाऱ्याने मायेने विचारपूस केली तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मध्य प्रदेशातील इंदोरमधील ही घटना आहे. या वृद्ध महिलेला तिच्या कुटुंबाने घराबाहेर काढलं होतं. कोणीही मदत करत नव्हतं तेव्हा महिला पोलीस उपमनिरीक्षक अनिला पराशर यांनी पुढाकार घेतला. अनिला पराशर यांच्यासमोर आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगताना या वृद्ध महिलेला अश्रू आवरत नव्हते.

इंदोरमध्ये राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या सांगण्यानुसार, तिच्या घरच्यांनीच तिला घऱाबाहेर काढलं. डोक्यावर छत नसल्याने कुठे जावं हे त्यांनी सुचत नव्हते. हातात काही मोजकं सामाने घेऊन त्या घऱाबाहेर पडल्या. आपण नेमकं कुठे जातोय याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. पण यावेळी अनिला पराशर त्यांच्या मदतीसाठी धावून आल्या. अनिला पराशर यांच्यासमोर जेव्हा त्यांना भावना अनावर होत होत्या तेव्हा त्यांनी त्यांचे डोळे पुसत मदतीचं आश्वासन दिलं. तसंच कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी ब्लॅंकेटही दिलं.

अनिला पराशर यांनी सांगितलं की, “त्या महिलेला पाहिलं तेव्हा त्या काहीशा चिंतित असल्याचं दिसत होतं. त्यांच्याजवळ गेले असता सर्व माहिती मिळाली. थंडी वाजत असल्याने त्या चिंताग्रस्त होत्या. आम्ही त्यांना ब्लँकेट दिलं आणि न्याय देण्याचं आश्वासन दिलं. वय झालं असल्याने कुटुंबीय त्यांचा सांभाळ करण्यास नकार देत आहेत. जेव्हा राहण्यासाठी कुठेच जागा नव्हती तेव्हा त्या तिथून निघून आल्या. सध्या आम्ही त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत”.

२०१९ पासून ब्लँकेटचं वाटप –

अनिला पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२०१९ पासून त्यांनी ब्लँकेट वाटप मोहीम सुरु केली आहे. २०१९ मध्ये गस्त घालत असताना एका महिलेला मी डोळ्यांसमोर मरताना पाहिलं होतं. तिच्याकडे काहीच नसल्याने ही वेळ ओढवली होती. तेव्हापासून मी ही मोहीम सुरु केली असून आज तीन वर्ष झाली. आमच्याकडे आता एका स्वयंसेवी संस्थेचाही पाठिंबा आहे. इंदोरमधील गरजू आणि वृद्धांना आम्ही हे ब्लँकेट वाटतो”.