आपली संस्कृती विविधतेने नटलेली आहे. वर्षभरात आपण अनेक सण-उत्सव साजरा करतो. तसेच वर्षाचा शेवटदेखील असाच छान होतो. कारण वर्षाअखेरीस दरवर्षी २५ डिसेंबरला संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे, भेटवस्तू देणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे आवडते. अशातच प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ख्रिसमसच्या म्हणजेच नाताळाच्या शुभेच्छा देत वाळूत खास कला सादर केली आहे.
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ट्विटरवरून एक खास गोष्ट शेअर केली आहे आणि नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुरी ओडिशा येथील बीचवर त्यांनी वाळूत सांताचे खास वाळूशिल्प रेखाटले आहे. सांताचा पोशाख लाल रंगाचा असतो म्हणून त्याचे शिल्प रेखाटताना कांद्याचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच सांताकडे झाडे भेस्तवस्तू म्हणून मागण्यात आली आहेत आणि खास गोष्ट अशी की, नाताळाच्या शुभेच्छा म्हणजेच मेरी ख्रिसमससुद्धा कांद्याच्या मदतीने वाळूत लिहिण्यात आले आहे. एकदा तुम्हीसुद्धा बघा हे खास शिल्प.
हेही वाचा…पोपटाने ख्रिसमस ट्रीला केली सुंदर सजावट; VIDEO तील पक्ष्याचा क्यूटनेसपणा पाहून तुमचाही दिवस होईल खास
पोस्ट नक्की बघा :
कांद्यातून साकारला सांता :
सुदर्शन पटनायक यांनी ख्रिसमसनिमित्त दोन टन कांदे वापरून “गिफ्ट अ प्लांट ग्रीन द अर्थ” या संदेशासह पुरी ओडिशा येथील ब्लू फ्लॅग बीचवर सांताचे जगातील सर्वात मोठे शिल्प वाळूत रेखाटले आहे. सुदर्शन पटनायक यांना याबद्दल प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. कांदे, वाळू आणि काही झाडे लावून त्यांनी एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. वाळूत १०० फूट लांब, २० फूट उंच आणि ४० फूट रुंद हे सुंदर शिल्प रेखाटले आहे. हे शिल्प पूर्ण करण्यासाठी सुदर्शन पटनायक यांना विद्यार्थ्यांनीसुद्धा मदत केली आहे, असे त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे.
सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वाळू कलाकार आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सुदर्शन पटनायक मूळचे ओडिशा राज्यातील आहेत. ते वाळूपासून अनेक कलाकृती बनवीत अनेकांची मने जिंकत असतात. आज त्यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही खास कला वाळूत सादर केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @sudarsanpattanik या त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
