माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या सुधा मूर्ती याचे नाव रविवारी सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत होते. यामागील कारण म्हणजे त्यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुधा मूर्ती भाज्यांच्या ढीगाऱ्यामध्ये बसल्या होत्या. या फोटोबरोबरच्या मजकुरामध्ये आपण श्रीमंत असल्याचा अहंकार वाटू नये म्हणून सुधा मूर्ती वर्षातून एक दिवस भाजी विकतात असा दावा करण्यात आला होता. मात्र या फोटो खरा असला तरी त्यामागील सत्य वेगळंच आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेला सुधा मूर्ती याचा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोध घेतल्यास हा फोटो २०१६ चा असल्याचे दिसून येतं. फोटो जुना असला तरी फोटो मागील कथा ही सुधा मूर्ती यांचे मोठेपण सांगणारीच आहे. सुधा मूर्ती समाजसेवा म्हणून आपल्या बेंगळुरुमधील जयानगर येथील घराजवळ असणाऱ्या राघवेंद्र स्वामी मंदिरामध्ये दरवर्षी सेवा कार्यासाठी जातात. येथे दरवर्षी होणाऱ्या राघवेंद्र आराधना उत्सवामध्ये सुधा मूर्ती सहभागी होतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये सुधा मूर्ती या सेवा कार्य करतात.

राघवेंद्र आराधना उत्सवादरम्यान सुधा मूर्ती पहाटे चार वाजता आपल्या सहकाऱ्यांबरोबर मंदिराच्या भोजनालयामध्ये जातात. हे सर्वजण तेथे भोजनालय आणि आजूबाजूच्या खोल्यांची साफसफाई करतात. त्यानंतर येथील भांडी, मांडण्यांची साफसफाई करतात. त्यानंतर सुधा मूर्ती या भाज्यांची विभागणी करु त्या स्वच्छ करुन कापण्यासाठी देण्याचं काम करतात. त्यानंतर सर्वजण मंदिर परिसराची साफसफाई करतात. सकाळ झाल्यानंतर मंदिरामध्ये प्रसादासाठी येणारे अन्न धान्य आणि इतर सामान भोजनायलामध्ये नेण्याचं कामही हे स्वयंसेवकच करतात. पहाटे चार ते नऊ सेवा केल्यानंतर सुधा मूर्ती पुन्हा घरी येतात आणि आपल्या दैनंदिन कामाला लागतात.

२०१३ मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तींनी, “पैसे दान करणं सोप्प आहे. मात्र प्रत्यक्षात उपस्थित राहून सेवा करणं नाही. शीख समाजाकडून मी या सेवा कार्यासाठी प्रोत्साहन घेते. त्यामुळेच मी अनेकदा दिल्लीतीर गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भाविकांच्या चप्पलांच्या स्टॅण्डजवळ बूट-चप्पल ठेवण्याचेही काम केलं आहे,” असं सांगितलं होतं. दरवर्षी मोहोत्सव काळामध्ये सुधा मूर्ती या मंदिरातील भोजनालयामध्ये स्टोअर मॅनेजरची भूमिका पार पाडतात असं राघवेंद्र स्वामी मंदिराचे अधिकारी सांगतात.

व्हायरल फोटो सोबत सुधा मूर्ती भाजी विकतात हा करण्यात आलेला दावा खोटा आहे. सुधा मूर्ती भाजी विकत नाहीत तर तीन सेवा देण्याच्या उद्देशाने काम करताना भाज्यांचे वर्गिकरण करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम करतात. त्यामुळेच या कामादरम्यान काढण्यात आलेला त्यांचा फोटो सध्या त्या भाजी विकतात अशा माहितीसहीत व्हायरल केला जात आहे.