Sulochana chavan Viral video: लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. सुलोचनाबाई चव्हाण यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. उर्दू नाटकं, हिंदी, मराठी, गुजराती या नाटकांतसुद्धा त्यांनी काम केलं होतं. साठ-सत्तरच्या दशकातला काळ तर त्यांनी अक्षरश: आपल्या ठसकेबाज गायनाने गाजवला होता. दरम्यान ठसकेबाज गायनाने ‘लावणी’ला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमधला जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचंही मन भरून येईल.
अतिशय साधे-सोज्वळ व्यक्तिमत्त्व असलेल्या सुलोचना चव्हाण यांचे लावणी या संगीत प्रकाराशी आकस्मिक जुळलेले नाते अखेरपर्यंत अतूट राहिले. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात पार्श्वगायनाची सुरुवात करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाला तिथेही रसिकदाद मिळाली. अगदी लहानपणी ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिले हिंदी गीत गायले होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्या या वयातही त्यांचा उत्साह कायम आहे. यावेळी त्यांनी “तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा…” ही लावणी गायली आहे. यावेळी त्यांचा आवाज त्यांचे हावभाव अगदी तरुणपणी होते तसेच आहेत. म्हणूनच म्हणतात ना..माणूस संपतो पण कला अमर राहते..सुलोचनाताईंचं २०२२ ला वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर आता त्यांचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय.
चित्रपट संगीत गायनात रमलेल्या सुलोचना यांच्या आयुष्यात संगीतकार वसंतराव पवार यांनी केलेल्या आग्रहाखातर लावणीचा प्रवेश झाला. सुरुवातीला लावणी गायनासाठी त्या मनापासून तयार नव्हत्या. मात्र त्यांच्या आवाजात ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची..’ ही पहिली लावणी ध्वनीमुद्रित झाली आणि मग ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘पदरावरती जरतारीचा’ अशा त्यांनी गायलेल्या अनेक बहारदार लावण्यांनी महाराष्ट्राला वेड लावले.
पाहा व्हिडीओ
marathilavani0909 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “माणूस संपतो… कला अमर राहते” वयाच्या ९२ या वर्षी त्याच उत्साहात लावणी गातात सुलोचनाताई चव्हाण… यालाच म्हणतात कलाकाराचं कलेवरील प्रेम.. सुलोचना उर्फ माई यांची एक हृदयस्पर्शी आठवण.. अगदी तसाच आवाज आहे…” तर दुसऱ्यानं “वयाच्या ९२ व्या वर्षी पण खरच तोड नाही आवाजाला सवाल जवाब आणि लावण्या सुलाचानाताईंच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा होती.” तर आणखी एकानं “लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सारखच सुलोचना ताईने लावणी क्षेत्रात खुप मोलाची कामगिरी केली आहे…वयाच्या ९२ व्या वर्षी तुमचा मधाळ आवाज आणि तिच अदाकारी पाहुन खुप भारी वाटल…मानाचा मुजरा ताईसाहेब तुम्हाला” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रया दिल्या आहेत.