Video: करोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या आल्याचं ऐकून शेकडो गावकऱ्यांनी केली गर्दी

ही गर्दी एवढी होती की हे पवित्र पाणी मिळवण्याच्या नादात धक्काबुक्की सुरु झाली, गर्दी हिंसक झाल्याचं पहायला मिळालं; तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले

Madhya Pradesh Viral Video
शेकडो लोकांनी हे पवित्र पाणी पिण्यासाठी मंदिराबाहेर गर्दी केली (फोटो : व्हायरल व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)

मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यामध्ये करोनावर मात करण्यासंदर्भातील एका अफवेमुळे शेकडो लोकांनी मंदिरात गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरामध्ये दोन पऱ्या आल्या असून त्यांनी दिलेलं पाणी प्यायल्याने करोनाचा आजार होणार नाही अशी अफवा कोणीतरी पसरवली. त्यानंतर मुख्य जिल्हा कार्यालयापासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या चाटूखेडामधील मंदिराबाहेर शेकडोच्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक गोळा झाले. हे सर्वजण भक्त म्हणून येथे आले नव्हते तर करोनाच्या भीतीने या लोकांनी पऱ्यांकडून मिळणारं पवित्र पाणी पिण्यासाठी गर्दी केली होती. या पऱ्यांनी दिलेलं पाणी प्यायल्यास करोना होत नाही तसेच झाला तर ठीक होतो असं या लोकांचा समज होता.

मंदिर परिसरामध्ये बुधवारी सकाळी ११ ते १२ दरम्यान शेकडो लोकांनी गर्दी केली होती. या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये करोनासंदर्भात असणारा अंधविश्वास किती आहे याची झलक पहायला मिळाली. दोन महिलांच्या अंगात देवी आल्याचं सांगून त्याच पऱ्या असल्याचं सांगत अफवा उठवण्यात आली. पाहता पाहता मंदिराबाहेर शेकडोच्या संख्येने गावकरी गोळा झाले. ही गर्दी एवढी होती की पवित्र पाणी मिळवण्याच्या नादात धक्काबुक्की सुरु झाली आणि गर्दी हिंसक झाल्याचं पहायला मिळालं. अनेकांनी मास्क लावले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही. या गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहेत.

हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तपास करुन या घटनेसाठी दोषी असणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली आहे. अफवा पसरवल्याचा ठपका ठेवत दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आलीय.

नक्की वाचा >> “अल्लाहसमोर रडत माफी मागीतल्यास करोना नष्ट होईल”; सपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलांनी गावकऱ्यांच्या हातावर पाण्याचे शिंतोडे उडवत ते पाणी चाटण्यास सांगितलं. हे पाणी शरीरात गेल्याने करोनाचा संसर्ग होणार नाही असा दावा या महिलांनी केला. तसेच ज्याला करोना झालाय तो त्यामधून पुर्ण बरा होईल आणि त्याला पुन्हा संसर्ग होणार नाही असा दावा महिलांनी केला. यावर विश्वास ठेऊन शेकडोच्या संख्येने लोक येथे जमा झाली. व्हिडीओ फोटो व्हायरल झाल्यावर तासाभराने पोलीस पोहचले आणि हा तमाशा संपला. पोलिसांनी गावामध्ये स्पीकरवरुन घोषणा करत अफवांवर विश्वास ठेऊन अंधश्रद्धेला बळी पडू नका असं आवाहन केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Superstition draws crowd in madhya pradesh village to seek covid protection scsg