Rat On The Menu Viral Video: रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठिकठिकाणी एफडीएच्या धाडी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर कारवाई करण्यात आली होती. असाच प्रकार आता सुरत रेल्वे स्टेशनवर घडला आहे. सुरत रेल्वे स्थानकातील एका चहाच्या स्टॉलवर ठेवलेल्या काचेच्या खाद्यपदार्थांच्या काउंटरमध्ये उंदीर घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा उंदीर प्रवाशांसाठी ठेवलेला पफ खाताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
२९ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास एका प्रवाशाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये काचेच्या काउंटरमध्ये एक उंदीर दिसत असून, तो इतर खाद्यपदार्थांसोबत ठेवलेला पफ कुरतडताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेतली.
VIDEO व्हायरल होताच स्टॉल बंद
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विनीत अभिषेक यांनी या घटनेची माहिती दिली. रेल्वे प्रशासनाला व्हिडीओची माहिती मिळताच संबंधित खाद्यपदार्थांचा स्टॉल तात्काळ बंद करण्यात आला. स्टॉल बंद केल्यानंतर तेथे स्वच्छता आणि साफसफाई करण्यात आली. तसेच रेल्वेच्या कमर्शियल विभागाने संबंधित स्टॉलच्या ऑपरेटरविरोधात कारवाई सुरू केली आहे.
स्टॉलचा करार कायमचा रद्द होणार?
या प्रकाराची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित स्टॉलचा करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या दिशेनेही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच सुरू केली होती विशेष स्वच्छता मोहीम
विशेष म्हणजे, हा प्रकार समोर येण्याच्या काही दिवस आधीच पश्चिम रेल्वेकडून सुरत आणि उधना रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी विशेष स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात आली होती.
रेल्वे स्थानकांवरील कॅटरिंग आउटलेट्समध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे निकष अधिक काटेकोरपणे पाळले जावेत, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच खाद्यपदार्थांच्या काउंटरमध्ये उंदीर घुसल्याचा प्रकार समोर आल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
१६ ऑगस्टलाच झाले होते Pest Control
पश्चिम रेल्वेचे CPRO विनीत अभिषेक यांच्या माहितीनुसार, सुरत स्थानकात १६ ऑगस्ट रोजीच कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही खाद्यपदार्थ ठेवलेल्या काचेच्या काउंटरमध्ये उंदीर आढळल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न
रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांचा मोठ्या संख्येने प्रवासी वापर करतात. अशा परिस्थितीत अन्नपदार्थांच्या ठिकाणी उंदीर किंवा इतर कीटक आढळणे ही गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे स्वच्छता, अन्नाची योग्य साठवणूक आणि कीटक नियंत्रण याबाबत रेल्वे कॅटरिंग स्टॉल्सनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुरत स्थानकातील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने केलेली कारवाई आता चर्चेचा विषय ठरली आहे.
