Swimming Pool Drowning Video: गुजरातमधील सुरत येथे घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अनेक लोकांच्या उपस्थितीत एक तरुण बुडत असतानाही आजूबाजूचे लोक त्याला वाचवू शकले नाहीत. कारण- ते त्याच्या हालचालींना केवळ ‘मजेशीर कलाबाजी’ समजत होते.
ही घटना २३ मार्च रोजी सुरत जिल्ह्यातील ओलपाड परिसरातील एका रिसॉर्टमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. त्या वेळी स्विमिंग पूलमध्ये आणि त्याच्या आसपास २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. वातावरण पूर्णपणे मोकळं, आनंदी आणि गजबजलेलं होतं; पण त्याच गर्दीत एक २२ वर्षीय तरुण शांतपणे पाण्यात उतरला… आणि काही क्षणांतच परिस्थिती बदलली.
व्हिडीओमध्ये दिसतं की, तो तरुण जवळपास दोन मिनिटं पाण्यात स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होता. तो हात हलवत, डोके वर काढण्याचा प्रयत्न करत मदतीसाठी इशारे करत होता. मात्र, हे सगळं पाहूनही आजूबाजूचे लोक त्याच्या इशाऱ्यांना तो पोहताना ‘करामत’ करीत असल्यासारखं समजत राहिले. त्यामुळे कुणीही त्यानं जीव वाचवण्यासाठी घातलेली साद ऐकू शकले नाही.
हळूहळू त्याची हालचाल मंदावली… आणि काही क्षणांतच तो पूर्णपणे निष्क्रिय झाला. तेव्हा मात्र काहींना संशय आला आणि त्याला बाहेर काढण्यात आलं. त्या वेळी तो बेशुद्धावस्थेत होता.
तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीनं त्याला ओलपाड येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. हा प्रसंग समजताच उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
या दुर्घटनेनंतर रिसॉर्टमध्ये जीवरक्षक नव्हते का? तसेच इतक्या लोकांच्या उपस्थितीत एक व्यक्ती तरणतलावात बुडत असत असताना मदतीसाठी हाका मारत असताना, ती परिस्थिती ओळखण्यात बघणार सर्व जण अपयशी कसे ठरले?, असे रिसॉर्टमधील सुरक्षा व्यवस्था आणि लोकांची जागरूकता यांबद्दलचे दोन महत्त्वाचे प्रश्न समोर आले.
तज्ज्ञ सांगतात की, बुडणारी व्यक्ती नेहमी मोठ्याने ओरडत नाही. त्यामुळे लोकांना त्यातून त्या व्यक्तीला धोका असल्याचे जाणवत नाही. हीच गोष्ट न ओळखण्याची सर्वांत मोठी चूक ठरते.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून स्तब्ध झाले आहेत आणि अशा प्रसंगी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना एक मोठा धडा देते की, पाण्याजवळ असताना किंवा अशा ठिकाणी उपस्थित असताना, कोणतीही असामान्य हालचाल दिसली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमची एक छोटीशी जागरूकता एखाद्याचा जीव वाचवू शकते.
