KBC मध्ये ५ कोटींचं बक्षीस जिंकणारा सुशील म्हणतो, त्यानंतर सगळंच बिघडत गेलं !

फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सांगितली कहाणी

अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने भारतामधील जनतेला वेड लावलं होतं. घराघरात KBC या नावाने प्रसिद्ध झालेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी रात्री घरातील सर्वजण टिव्हीसमोर न चुकता बसायचे. या कार्यक्रमामुळे अनेकांचं नशीब उजळलं. २०११ साली सुशील कुमार हा व्यक्ती या कार्यक्रमात ५ कोटींचं बक्षीस जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला. IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सुशील कुमारकडे या पैशांमधून खूप काही चांगल्या गोष्टी करण्याची संधी होती. परंतू पैसे गुंतवताना घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आता सुशील कुमारला हालाकीचं आयुष्य जगावं लागत आहे. ५ कोटींचं बक्षीस जिंकल्यानंतर आपल्या आयुष्यात सर्व कसं बिघडत गेलं हे सुशीलने आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून…सांगितलं आहे.

२०१५ ते २०१६ हा काळ माझ्यासाठी खूप खडतर गेल्याचं सुशील कुमारने सांगितलं. “तो काळ असा होता की मी सेलिब्रेटी बनलो होतो. बिहारमधील प्रत्येक कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे. परंतू याच प्रसिद्धीमुळे माझं शिक्षण मागे पडलं. त्यावेळी मी मीडियाला खूप सिरीअसली घ्यायचो, काही स्थानिक उद्योगांमध्ये मी पैसे गुंतवले होते. परंतू यातील बहुतांश उद्योगधंदे हे बुडले ज्यामुळे मला आर्थिक फटका बसला. त्या काळात मला दानधर्म करण्याची सवय होती. मी महिन्याला ५० हजार रुपये दान करायचो. अनेकांनी यानंतर माझ्या या सवयीचा गैरफायदाही घेतला. यादरम्यान माझ्या पत्नीसोबत माझे संबंधही तणावाचे व्हायला लागले.” सुशील कुमारने फेसबूक पोस्टमध्ये आपली बाजू मांडली आहे.

यानंतर सुशीलने ट्रॅव्हलिंगच्या धंद्यात पैसे गुंतवले, ज्यातून त्याला महिन्याला उत्पन्न मिळत होतं. धंद्याच्या निमीत्ताने सुशील कुमार नेहमी दिल्लीला प्रवास करायचा यावेळी त्याची ओळख काही विद्यार्थ्यांसोबत झाली. त्यांच्याशी बोलल्यानंतर आपण या सर्वांपेक्षा किती कमी आहोत याची जाणीव सुशीलला झाली. दरम्यानच्या काळात सुशीलला चित्रपटांचं वेड लागलं होतं. तो संपूर्ण दिवस घरात चित्रपट पाहण्यात घालवायचा. एकदा एका पत्रकाराने मुलाखतीसाठी सुशीलला फोन केला होता, ज्यावेळी संतापून सुशीलने त्या पत्रकाराला मी माझा सर्व पैसा गमावून बसलो आहे. सध्या मी दोन गायी विकत घेतल्या असून त्यांचं दुध विकून गुजराण करत आहे…असं सांगितलं. ही बातमी पेपरमध्ये आल्यानंतर सुशीलला चांगलाच मनस्ताप झाला. दरम्यानच्या काळात लोकं त्याच्यापासून दूर रहायला लागली.

चित्रपटांचं वेड लागलेल्या सुशीलने यानंतर मुंबईत येऊन टिव्ही इंडस्ट्रीत काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही त्याला अपयश आलं. अखेरीस आपली चूक उमगल्यानंतर सुशीलने पुन्हा गावी परतण्याचं ठरवलं. गावी आल्यानंतर त्याने शिक्षक बनण्यासाठीची परीक्षा दिली ज्यात तो पासही झाला. सध्या सुशील स्थानिक सामाजिक संघटनांसोबत छोटी-मोठी कामं करतो. अभ्यासात मन रमवल्यानंतर आता दारु-सिगरेट याची आठवणही येत नसल्याचं सुशीलने सांगितलं. २०१६ नंतर मी दारुला स्पर्शही केला नसल्याचं सुशीलने सांगितलं. गेल्या वर्षापासून मी सिगरेटही सोडल्याचं सुशील म्हणाला. आपल्या गरजा कमी ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं सुशील म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushil kumars life took a turn for the worse after winning rs 5 crore on kbc psd

ताज्या बातम्या