कोणत्याही सरकारी कार्यालयात घुसून तालिबानी काढतायत सेल्फी; देशाचे संरक्षणमंत्री संतापून म्हणाले…

तालिबानी कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवून सेल्फी काढताना दिसत असून यावर आक्षेप घेण्यात आलाय.

Taliban
तालिबान्यांच्या सेल्फी काढण्याच्या सवयीवर आक्षेप घेण्यात आलाय. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेऊन दीड महिन्यांला कालावधी पूर्ण होत आला आहे. मात्र सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं आणि बेजबाबदार वर्णवणूक वाढल्याच संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत आल्याने यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आलीय. तालिबानचा दिवंगत नेता मुल्ला ओमर याचा मुलगा आणि सध्या संरक्षण मंत्री अशणाऱ्या मुल्ला मोहम्मद याकूब यांनी यासंदर्भात एक ऑडिओ मेसेज जारी केलाय असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

“लोकांना त्रास देणाऱ्या आणि छळ करणाऱ्यांना आपल्या तुकड्यांपासून दूर ठेवा नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाईल,” असं या संदेशामध्ये म्हटलं आहे. आपल्या संघटनेमध्ये अशी लोकं नकोत, असंही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. सुन्नी पश्तून असणाऱ्या तालिबान्यांनी आधीचं सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात बंड करुन सत्ता ताब्यात घेतली. मात्र पूर्वी म्हणजेच १९९६ ते २००१ दरम्यान ज्या पद्धतीने कारभार केला तशी हिंसा आता होणार नाही आणि आता तालिबान वेगळ्या पद्धतीने सर्वांचा समावेश करुन कारभार करेल असं सांगण्यात आलेलं. मात्र काही बातम्यांनुसार तालिबान्यांनी काबूलमधील सर्वसामान्यांना त्रास दिल्याच्या घटना घडल्यात. मात्र अशापद्धतीने तलिबान्यांनी सर्वसामान्यांचा छळ केल्यास ते सरकारकडून सहन केलं जाणार नाही असं याकूब यांनी स्पष्ट केलं आहे.

आपण अफगाणिस्तानमध्ये केलेल्या घोषणेनुसार कोणत्याही मुजाहिद्दीनने बदला घेण्याच्या मानसिकतेमधून लोकांवर अत्याचार करता कामा नये, अशी आठवण याकूब यांनी तालिबानमधील सदस्यांना करुन दिलीय.

याकूबने शेअर केलेली ही ऑडिओ क्लिक तालिबान समर्थक सोशल मीडियावरुन व्हायरल करत असून अनेक अकाऊंट्सवरुन ती शेअर करण्यात आलीय. तरीही याकूब नक्की कोणत्या घटनेबद्दल बोलत आहेत हे या क्लिपमधून स्पष्ट झालेलं नाही. मात्र सर्वसामान्यांना कारण नसताना आणि बदल्याच्या हेतूने अत्याचार करु नका असं तालिबानने स्पष्ट केलंय. तालिबानमध्येच सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. काहींना नवीन धोरणांनुसार कारभार करायचाय तर काहींनी या धोरणांविरोध केलाय.

याकूब यांनी तालिबान्यांच्या आणखीन एका सवयीबद्दल भाष्य केलं आहे. मागील काही आठवड्यांपासून तालिबानी कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवून सेल्फी काढताना दिसत आहेत.

“हे फारच आक्षेपार्ह आहे की प्रत्येकजण त्याचा मोबाईल काढून महत्वाच्या आणि संवेदनशील परिसर असणाऱ्या मंत्रालयांमध्ये फोटो काढत सुटलाय. विशेष म्हणजे काही करण नसताना हे फोटो काढले जात आहे. अशाप्रकारे सेल्फी काढणे, भटकणे आणि व्हिडीओ काढण्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीय,” अशा शब्दात याकूब यांनी तालिबान्यांना बजावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taliban defence minister miffed with fighters taking selfies in govt offices scsg

फोटो गॅलरी