सध्या बहुतांश जोडप्यांचा डेस्टिनेशन वेडिंगवर भर आहे. डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना सर्वत्र जोरात सुरु आहे. पण काही जोडपी त्या पलीकडे जाऊन, हटके पद्धतीने विवाह करतात. लग्न ही आयुष्यभराची आठवण आहे. त्यामुळे नवरा आणि नवरी दोघेही या दिवसाला खास बनवण्याचा प्रयत्न करतात.

तामिळनाडूत एका जोडप्याने चक्क समुद्रात पाण्याखाली जाऊन विवाह केला. चेन्नईत नीलंकराईच्या समुद्रात ६० फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी लग्न केले. तिरुवन्नामलई येथे राहणाऱ्या चिन्नादुराई आणि कोईंमबतोरच्या श्वेताने पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याऐवजी आयुष्यभरासाठी एक वेगळी आठवण म्हणून पाण्याखाली जाऊन लग्न करायचं ठरवलं. समुद्रात जमा होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येबद्दल जनजागृती करण्याचाही त्यांचा हेतू होता.

लग्नासाठी कशी केली तयारी?
लग्न पाण्याखाली होणार असल्याने श्वेताने खास स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेतले होते. लग्नासाठी दोघांनी पण पारंपारिक पोषाख परिधान केला होता. स्कुबा डायव्हिंगला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने त्यांचा पोषाख डिझाइन करण्यात आला होता.

असं झालं लग्न
लग्नासाठी त्यांनी बोटीमधून नीलंकराईच्या समुद्रात डुबकी मारली. ४५ मिनिट पुरेल इतका ऑक्सिजन साठा त्यांच्याकडे होता. समुद्रात आत ६० फूट खोलवर गेल्यानंतर परस्परांच्या गळयात वरमाला घालून ते विवाहबद्ध झाले.