Teacher Made Student Oath For 35 Rupees: छडी लागे छमछम, विद्या येई घमघम हे वाक्य आपणही ऐकून असाल. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी काही वेळा शिक्षेचा मार्ग अवलंबावा लागतो असा साधारण या वाक्याचा अर्थ आहे. कधी कधी अशा शिक्षांची गरजही असते पण शिक्षेचं स्वरूप हे समोरच्याला दुखावणारं नसेल याचंही शिक्षकांनी भान ठेवणं गरजेचं असतं. हे भान हरपल्याने आता पाटणा येथील बांका जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत एका महिला शिक्षिकेची शुक्रवारी शिक्षण विभागाने बदली केल्याचे समजतेय. टाइम्सच्या वृत्तानुसार, सदर शिक्षिकेने आपल्या पर्समधून हरवलेल्या ३५ रुपयांच्या चोरीच्या संशयातून सर्व शाळकरी मुलांना जवळच्या मंदिरात नेले होते. शिक्षिकेच्या या वागण्यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेत दुसऱ्या दिवशी शाळेच्या आवारात गोंधळ घातला आणि शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी भाग पाडले.

सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समजते की, बुधवारी राजौन ब्लॉकमधील अस्मानीचक गावात विद्यार्थी शाळेत येताच शाळेतील शिक्षिका नीतू कुमारी यांनी एका विद्यार्थ्याला तिच्या पर्समध्ये ठेवलेली पाण्याची बाटली आणण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच तिने पर्स तपासली असता तिला ३५ रुपये गहाळ झाल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्यापैकी कोणीही तिच्या हरवलेल्या ३५ रुपयांबद्दल खात्रीशीर उत्तर देत नव्हते. यानंतर शिक्षिकेने जो काही प्रकार केला तो खरोखरच चकित करणारा आहे. नीतू कुमारी हिने सर्व मुलांना जवळच्या मंदिरात नेले आणि त्यांना “मी चोरी केली नाही” असे म्हणत देवतांची शपथ घेण्यास सांगितले. त्या दिवशी एकूण १२२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते आणि ड्युटीवर असलेल्या त्या एकमेव शिक्षिका होत्या. शाळेमध्ये फक्त दोन शिक्षक आहेत.

सदर प्रकाराबाबत ग्रामस्थ आणि मुलांच्या पालकांनी गुरुवारी कोणत्याही विद्यार्थ्यावर संशय घेणे अयोग्य आहे असं म्हणत शाळेच्या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली, अन्यथा शाळा भरू देणार नाहीत असाही इशारा ग्रामस्थांनी दिला. ब्लॉक शिक्षण अधिकारी (बीईओ) कुमार पंकज यांनी शुक्रवारी TOI ला सांगितले की, या प्रकरणानंतर शिक्षिकेची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत शाळेतील शिक्षिका नीतू म्हणाल्या की तिने विद्यार्थ्यांकडून फक्त तिच्या हरवलेल्या पैशांबद्दल चौकशी केली. “विद्यार्थ्यांनी स्वतः जवळच्या मंदिरात देवतांसमोर शपथ घेण्यासाठी धाव घेतली, गावकऱ्यांनी शाळेच्या आवारात घुसून गोंधळ घातल्यानंतर मला धक्का बसला. मी गेल्या १८ वर्षांपासून या शाळेत शिकवते आहे. मी माझ्याच विद्यार्थ्यांवर संशय कसा घेऊ शकते. मी फक्त विचारलं होतं”.

हे ही वाचा<< पतीने पत्नीला सार्वजनिक ठिकाणी कानाखाली मारणे हा विनयभंग आहे का? जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो?

दुसरीकडे, गावाच्या प्रमुख अनुपम कुमारी म्हणाल्या की, शिक्षकांची अशी वागणूक योग्य नाही. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आम्ही शनिवारी शिक्षक आणि पालकांची बैठक बोलावली आहे.”