मुख्याध्यापक पदासाठी दोन व्यक्तींनी तुंबळ हाणामारी केल्याचं प्रकरण समोर आलंय. बिहारच्या चंपारण जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. हाणामारी करणाऱ्या दोघांपैकी एक जण शिक्षक आहे, तर दुसरा शिक्षिकेचा पती आहे. या दोघांनी मोतीहारी येथील राज्य शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांसमोरच राडा घातला. दोघांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दोघांपैकी एक जण शिक्षक असून त्याचं नाव शिवशंकर गिरी आहे. तर, त्याच्यासोबत हाणामारी करणारी दुसरी व्यक्ती हा शिवशंकर गिरी यांच्या प्रतिस्पर्धी रिंकी कुमारीचा पती आहे. शिवशंकर गिरी आणि रिंकी कुमारी दोघेही आदापूरच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असून दोघांनाही मुख्याध्यापक पद हवंय. शिक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही शिक्षक मुख्याध्यापक पदासाठी गेल्या तीन महिन्यांपासून भांडत आहेत.  पदासाठी कोण वरिष्ठ आणि अधिक पात्र आहे, यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होता.

याच दरम्यान, जिल्हा शिक्षण विभागाने शिवशंकर गिरी आणि रिंकी कुमारी या दोघांना त्यांच्या शिक्षण आणि पात्रतेची कागदपत्रे तीन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. त्यातही आधी कोण कागदपत्रे सादर करणार यावरूनही दोन्ही शिक्षकांमध्ये भांडण झाले. त्याची सुरुवात एकमेकांना शिवीगाळ करण्यापासून झाली. त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यावेळी रिंकी कुमारीच्या पतीने गिरीला जमिनीवर पाडून मारलं. तर, घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी दोघांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

गटशिक्षणाधिकारी हरिओम सिंह हे देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे “अचानक जे काही घडलं याची आम्ही चौकशी करत आहोत,” असं सिंह यांनी सांगितलं. तर, भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तर एका पदासाठी माणूस जागेचं भान न ठेवता हाणामारी करू शकतो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.