Matchbox Silk Saree Video : साडी हा महिलांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. वेगवेगळ्या रंगांच्या, प्रकारांच्या साड्या नेसण्याची महिलांना फार आवड असते. काही महिलांचे तर अर्धे कपाट साड्यांनीच भरलेले असते. तुम्ही आत्तापर्यंत रुमाच्या आकाराची साडी पाहिली असेल, पण कधी माचिसच्या पेटीत मावेल इतकी साडी पाहिलेय का? हे वाचून तुम्ही चकित व्हाल, पण तेलंगणातील एका विणकराने खरंच इतकी छोटी साडी तयार केलीय, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तेलंगणातील सिरसिला येथील एका अत्यंत प्रतिभावान विणकराने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यांनी ही विशेष आणि दुर्मिळ रेशमी साडी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्रीशैलम मंदिरात देवी भ्रमरांबेला अर्पण केली आहे.

१ आठवडा अन् अप्रतिम कारागिरी

पीटीआयच्या वृत्तानुसार, ही अनोखी साडी कलारत्न पुरस्कार विजेते हातमाग विणकर नल्ला विजय कुमार यांनी तयार केली आहे . याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कुटुंबासह मिळून आठवडाभर खूप मेहनत घेत पारंपारिक हातमागावर ही अनोखी साडी विणली आहे. विजय कुमार यांनी या सुंदर साडीच्या निर्मितीचे श्रेय आदिशक्तीच्या कृपेला दिले आहे.

या अनोख्या साडीचे वैशिष्ट्ये काय?

ही पाचवारी साडी आहे आणि तिची लांबी ५.५ मीटर आणि रुंदी ४८ इंच आहे. पूर्ण लांबीची असूनही या रेशमी साडीचे वजन फक्त २०० ग्रॅम आहे. ही साडी पारंपरिक इक्कत पॅटर्नमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने डिझाइन केली आहे . तिचे विणकाम इतके बारीक आणि नाजूक आहे की, घडी घातल्यावर ही साडी एका लहान माचिस बॉक्समध्ये सहज मावते.

मंदिर ट्रस्टने केले स्वागत

नल्ला विजय कुमार यांनी श्री भ्रामरंबा मल्लिकार्जुन स्वामी मंदिर विश्वस्त मंडळाकडे ही अद्वितीय साडी अर्पन केली . ही अद्भुत भेट स्वीकारताना मंदिराचे अध्यक्ष रमेश नायडू यांनी विणकराच्या कौशल्याची प्रशंसा केली.

ते म्हणाले की, हातमाग विणकाम हा केवळ एक व्यवसाय नसून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपल्या देशाची एक महान आणि गौरवशाली कला आहे. त्यांनी सर्वांना देशातील विणकरांना आणि हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.