Temjen Imna Along Viral Video: नागालँडचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ईशान्य भारतातील एक व्यक्तीला केवायसीवेळी फेस रिकग्निशन होण्यास डोळ्यांचा आकार आणि येथील लोकांच्या चेहऱ्यांमधील साम्य यामुळे अडचण येत असल्याचे दिसत आहे. ईशान्य भारतातील लोकांच्या चेहऱ्यांमधील साम्याबाबत असलेल्या समजावर आधारित हा विनोद आहे. अलोंग यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.
मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी शेअर केला व्हिडीओ
“स्ट्रगल इज रिअल” या कॅप्शनसह मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. केवायसीसाठी स्पष्ट फोटो काढता यावा म्हणून गावातील इतर लोक एका व्यक्तीचा चेहरा पकडून त्याच्या डोळ्यांच्या पापण्या वर ओढताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी तंत्रज्ञानातील मर्यादांवर बोट ठेवत प्रशासनाने यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
युझर्सच्या कमेंट
“यात तुमची नव्हे तर तंत्रज्ञानाची चूक आहे”, अशी कमेंट एका युझरने केली आहे. “भारतीयांच्या संभाव्य शारीरिक वैशिष्ट्यांचा विचार करून हे तंत्रज्ञान विकसित केलेले दिसत नाही,” असेही या युझरने पुढे म्हटले आहे. एका युझरने याबाबत थेट ग्रॉकला प्रश्न विचारत उपाय सुचविण्याची मागणी केली. “डोळ्यांच्या पापण्यांवर एपिकॅंथिक फोल्ड असलेल्या लोकांच्या बायोमेट्रिक आयरीस स्कॅनिंग करण्याचा कोणता पर्याय उपलब्ध असू शकतो?, असा प्रश्न युझरने विचारला.
एपिकॅंथिक फोल्ड
दरम्यान, एपिकॅंथिक फोल्ड किंवा मोनोलिड आझ ही डोळ्यांची अशी रचना असते, ज्यामध्ये वरच्या पापण्या डोळ्यांच्या आतील कोपऱ्याला झाकतात. ईशान्य भारतातील लोकांमध्ये ही जैविक रचना सामान्यतः आढळते. “चीन, जपान आणि इतर आग्नेय आशियाई देशांनी या समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय शोधला असेल. भारतीय प्रशासन अशा प्रकारचे तंत्रज्ञान का स्वीकारत नाही?” असा प्रश्नही एका युझरने उपस्थित केला. तर एका युझरने “केवायसी प्रक्रियेत पर्यायी पर्याय म्हणून फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे) पडताळणीलाही परवानगी दिली पाहिजे,” असा सल्ला दिला.
