फुटबॉल, क्रिकेट यासारख्या सांघिक खेळात अनेकदा आपण वाद झाल्याचे पाहतो. अनेकदा स्टेडियममध्ये बसलेले चाहते एकमेकांना भिडताना पाहिले आहेत. मात्र एकेरी स्पर्धक असलेल्या खेळात क्वचितच हा प्रकार पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात खेळाडूंमध्ये वाद शक्यतो होत नाही. आक्रमक खेळी केली तरी शेवटी खेळभावना दाखवत एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्याचं आपण पाहतो. पण एका टेनिस स्पर्धेदरम्यान पराभूत खेळाडूने विजयी खेळाडूच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आयटीएफ ज्युनियर्स स्पर्धेत ही घटना घडली आहे. नंबर वन सीडेड खेळाडू मायकेल कौमे आणि राफेल एनआय अंकारा यांच्यात सामना सुरू होता. टेनिस स्पर्धेत राफेल एनआय अंकाराने सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये मायकेल कौमेचा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये कौमेने जोरदार पुनरागमन करत सेट जिंकला. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक सेट जिंकला होता. तिसऱ्या सेटमध्ये दोघांमध्ये चुरशीची लढत झाली पण शेवटी अंकाराने बाजी मारली. त्यांनी कौमाचा ६-२,६-७,७-६ असा पराभव करून सामना जिंकला. वास्तविक, सामन्याच्या शेवटी जेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. पण यावेळी कौमेने आपल्या प्रतिस्पर्ध्याला जोरदार कानशिलात लगावली. आता या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

घडलेला प्रकार पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले लोकांनाही धक्का बसला. या घटनेचा टेनिसप्रेमींनी निषेध केला आहे. तसेच घडल्याप्रकाराबद्दल कौमेने माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.