Accident Hit And Run video: काही दिवसांपासून देशभरात ‘हिट ॲण्ड रन’ची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या ‘हिट ॲण्ड रन’च्या घटनेचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये तेलंगणातील हणमकोंडा येथे वेगवान कारने धडक दिल्याने एक महिला जखमी झाली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रस्त्यावर काम करताना भरधाव कारने तिला धडक दिल्याने महिला जमिनीवर पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अपघातात जखमी झालेली महिला साफाई कामगार असल्याचे सांगण्यात येत असून, ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाजवळ रस्ता झाडून साफसफाई करीत होती. रामांची सम्माक्का, असे या महिलेचे नाव असून, आंबेडकर सर्कल ते हणमकोंडा येथील जुन्या बसआगाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली. अपघाताला दोषी असलेल्या चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून केली जात आहे. याबाबतचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, ही दुर्घटना शनिवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. आपले काम करीत पोटासाठी राबणाऱ्या या माऊलीची यामध्ये काहीच चूक नसताना तिला या अपघाताला सामोरे जावे लागले.
चालकाने आपल्या कारने महिलेला धडक दिली आणि तेथून तो पळून गेला. एवढी मोठी चूक करूनही माणुसकीहीनता दाखवीत तो त्या महिलेला मदत करण्यासाठीही थांबला नाही. व्हिडीओमध्ये ही महिला रस्ता झाडताना दिसत आहे आणि त्यानंतर वेगाने येणारी लाल रंगाची ‘फोर्ड फिगो’ कार (अद्याप याची पुष्टी झालेली नाही) महिलेला धडक देते आणि तो चालक तेथे थांबण्याची माणुसकीही दाखवीत नाही आणि पळून जातो. या भीषण अपघातात सुदैवाने महिला बचावली; मात्र ती गंभीर जखमी झाली. यावेळी रस्त्याच्या पलीकडे एक दुचाकीस्वार महिलेला मदत करण्यासाठी थांबताना दिसत आहे. तो माणूस त्या महिलेच्या दिशेने धावतो आणि तिला उठण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘बस दो मिनिट…’ म्हणत तुम्हीही मॅगी खाताय? ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी संतापले आहेत. वापरकर्त्यांपैकी एक म्हणाला, “कारमालकावर आवश्यक ती कारवाई करा.” आणखी एका युजरने सांगितले, “कारचालकाला कडक शिक्षा झाली पाहिजे.” तर, आणखी एका युजरने संशय व्यक्त करीत, “त्याने हे जाणूनबुजून केले, असे दिसते,” असे म्हटले आहे.