Biker Runs Over Snake: “सापाशी पंगा घेतला की जीवावर बेतते!” हे आपण अनेकदा ऐकले आहे. पण चुकून, अनावधानाने घेतलेला पंगादेखील किती भयंकर ठरू शकतो, याचं भयावह उदाहरण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका युवकानं न कळत रस्त्यावर आलेल्या सापावर बाईक चढवली आणि पुढच्याच क्षणी जे घडलं, ते पाहून लोकांचा श्वास रोखला गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सापावर चढली बाईक… आणि क्षणात घेतला ‘बदला’
व्हिडीओच्या सुरुवातीला एक साप रस्त्यावरून सरपटताना दिसतो. काही क्षणांनी एक बाईकस्वार तिथून जातो आणि साप रस्त्यात असल्याचं न समजल्याने बाईक थेट त्याच्यावरून जाते, त्यामुळे साप चिरडला जातो. पण, इथेच गोष्ट संपत नाही… उलट खरी थरारक सुरुवात इथूनच होते.
बाईकस्वार जसा बाईक मागे घेतो, तसा जखमी साप झटक्यात उडी मारून थेट त्याच्या पायाला दंश करतो. हे दृश्य इतकं अचानक आणि भीतीदायक आहे की पाहणाऱ्यांचाही थरकाप उडतो.
बाईकस्वारला समजलंही नाही की साप चावला आहे!
सगळ्यात धक्कादायक म्हणजे बाईकस्वाराला क्षणभरही कळलं नाही की त्याला सापाने डंख केला आहे. तो शांतपणे बाईक मागे घेत राहतो. पण, काही क्षणांनी रस्त्यावर तडफडणारा साप नजरेस पडताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरतात. अचानक तो घाबरून जातो, त्याचे संतुलन बिघडते आणि तो बाईकसह रस्त्यावर कोसळतो. या क्षणी कॅमेर्यात कैद झालेली त्याची भीती, घाई-गडबड आणि त्याच्यावर आलेली अनपेक्षित संकटाची सावली सगळं दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.
न कळत चूक… पण किंमत मोठी?
या घटनेनंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, शेवटी या युवकाचे प्राण वाचले का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला आणि कमेंट सेक्शनमध्येही लोकांचे अनेक चकित करणारे प्रतिसाद दिसले. काहींनी म्हटलं,
“सापावर चुकून बाईक गेली, त्यामुळे सापाने स्वतःचा बचाव केला.” “बाईकस्वाराची चूक नाही, त्याला दिसलंच नसणार.” “अशा प्रकारच्या रस्त्यावर विशेष काळजी घ्यावी.” एका युजरने लिहिले, “त्याला साप आधी दिसला असता तर त्याने कधीच त्याच्यावरून बाईक नेली नसती.” सध्या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया थांबण्याचं नाव घेत नाहीत
सापाची अचानक झेप, युवकाचं घाबरत कोसळणं आणि मग निर्माण झालेला सस्पेन्स; या सर्वांनी व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्हायरल बनवलं आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून सावध झाल्याचेही म्हणत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे, याची ही घटना जाणीव करून देते.
एक छोटीशी चूक कधी कधी किती मोठ्या संकटात रूपांतरित होऊ शकते, याचा हा जिवंत पुरावा ठरला आहे.
