Street Dogs Attack On Girl In Sambhajinagar : देशातील अनेक शहरांमध्ये भटक्या श्वानांची दहशत वाढताना दिसत आहे. भटक्या श्वानांबाबत अनेकांची वेगवेगळी मते पाहायला मिळतात. त्यामुळे या मुद्द्यावरून अनेकदा वाद विवाद, मारामारीच्या घटना पाहायला मिळतात. नुकतेच महाराष्ट्रातील संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणीवर जवळपास पाच ते सहा श्वानांनी जीवघेणा हल्ला केल्याचे दिसत आहे. ही थरारक घटना जवळच असलेल्या एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदी झाली आहे, ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात श्वान चावल्याने तसेच वाहनांच्या मागे धावल्याने अनेक अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुणी रस्त्यावरून आरामात चालत होती. यावेळी एक श्वान मागून धावत आला आणि तरुणीच्या समोर जाऊन तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करू लागला, यानंतर समोरून आणि मागून असे चार ते पाच श्वान धावत आले आणि तरुणीवर हल्ला करू लागले. घाबरलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी जीव तोडून किंचाळू लागली, ओरडू लागली. मात्र, कशीबशी तिने या श्वानांपासून आपली सुटका करून पळ काढला. मात्र, त्यानंतरही श्वान तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होते. श्वानांनी तरुणीला ज्या ठिकाणी घेरले, त्या ठिकाणी दुसरे कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करत राहिली, पण कोणीही आले नाही.

गुलाबी साडीनंतर आता गुलाबी डॉल्फिनची चर्चा, PHOTO पाहून नेटीझन्स अवाक्, म्हणाले, “कमाल..”

शहरातील विविध भागांत १० ते १५ भटके श्वान लोकांवर हल्ला करून त्यांचा पाठलाग करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पण, केवळ संभाजीनगरच नाही तर देशातील अनेक शहरांमध्ये श्वानांच्या हल्ल्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. लहान मुले, महिला आणि पुरुषांवर भटक्या श्वानांचे हल्लेही वाढले आहेत. त्यांना पकडण्यासाठी महापालिकेकडून अनेकवेळा मोहीम राबविण्यात येते. या श्वानांमुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे. लोक इतके भयभीत झाले आहेत की, त्यांच्या जवळ जाण्याची त्यांना भीती वाटते.