Man Caught Peeing On Camera Outside Indian Restaurant In Texas: अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने रेस्टॉरंटच्या बाहेरच उघड्यावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या घृणास्पद प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना टेक्सासमधील ‘प्लानो’ (Plano) येथील ‘मुमताज इंडियन रेस्टॉरंट’ (Mumtaz Indian Restaurant) समोर २१ मार्च रोजी घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेस्टॉरंटच्या अगदी बाहेर लघवी करताना दिसत आहे. हा माणूस याच रेस्टॉरंटचा कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावर टॅटू स्टुडिओ चालवणाऱ्या रायन डॉसन (Ryan Dawson) यांनी हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
बाथरूम लॉक असल्याचं दिलं कारण
व्हिडिओमध्ये डॉसन त्या कर्मचाऱ्याला जाब विचारताना दिसत आहेत. “तुम्ही इथे काम करता आणि इथेच लघवी करता?” असा प्रश्न विचारला असता, त्या कर्मचाऱ्याने “मी आवरू शकलो नाही,” असे उत्तर दिले. जेव्हा त्याला विचारले की त्याने रेस्टॉरंटमधील बाथरूम का वापरले नाही, तेव्हा त्याने ते ‘लॉक’ असल्याचे सांगितले. मात्र, काही सेकंदातच तो व्यक्ती रेस्टॉरंटकडे गेला आणि दरवाजा सहज उघडला गेला. यावर डॉसन यांनी संतापून विचारले, “आता अचानक दरवाजा कसा काय उघडला?”
डॉसन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शन दिले की, “माझ्या आणि त्याच्या व्यवसायाच्या समोरच हा घाणेरडा प्रकार सुरू होता. अशा लोकांमुळे व्यवसायाची प्रतिमा मलीन होते.”
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत:
- नेटकऱ्यांचा संताप: “हे अत्यंत घृणास्पद आहे, तुम्ही त्याला जाब विचारला हे चांगलं केलं,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
- कर्मचाऱ्याची बाजू: काहींनी त्या कर्मचाऱ्याची बाजू घेताना म्हटले की, “कदाचित त्याला एखादी मेडिकल इमर्जन्सी असू शकते किंवा किडनीचा त्रास असू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ हटवावा.”
पोलिसांची कारवाई
रायन डॉसन यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली आणि व्हिडिओदेखील सुपूर्द केला. मात्र, पोलिसांनी सांगितले की अशा प्रकरणांत कारवाई करण्याला मर्यादा आहेत. संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी केवळ तोंडी ताकीद देऊन सोडले आहे. डॉसन यांच्या मते, त्यांनी खूप कष्टाने आपला व्यवसाय उभा केला आहे आणि अशा प्रकारची बेशिस्त ते त्यांच्या व्यवसायाभोवती सहन करणार नाहीत.
