थायलंडच्या संसदेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देशातील सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होत असताना काही खासदार महिलांचे अश्लील फोटो बघत असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार रोनाथेप अनुवत हे पॉर्नोग्राफीक कंटेंट बघताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. देशातील सत्ताधारी पालंग प्रचारथ पार्टीचे खासदार असणारे अनुवत हे चोनबुरी येथून निवडूण आलेले आहेत. खासदार अश्लील फोटो बघत असल्याचा व्हिडिओ गॅलरीमधून एका पत्रकाराने रेकॉर्ड केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. डेलीमेलबरोबरच अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्तांकन केलं आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सत्ताधारी पक्षाचा हा खासदार १० मिनिट हे अश्लील फोटो बघत होता. फोटो नीट बघता यावे यासाठी त्याने तोंडावरील मास्कही काढलं होतं. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात नंतर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता खासदाराने आपण महिलेचे नग्न फोटो बघत असल्याची कबुली दिली. मात्र आपल्याला त्या महिलेनेच लाइन या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून हे फोटो पाठवल्याचा दावा खासदाराने केला. या महिलेने आपल्याला आर्थिक मदत हवी असल्याचे मला सांगितले. त्यामुळेच मी तिचे फोटो पाहत होतो. ही महिला कोणत्याही अडचणीत नाही ना हे तपासून पाहण्यासाठी आपण तिचे फोटो अगदी न्याहाळून पाहत होतो असंही या खासदाराने म्हटलं आहे. एका गुंडाने या महिलेचा छळ केला असून त्यानेच तिला अशापद्धतीने नग्न फोटो काढण्यास बळजबरी केल्याचा दावाही खासदाराने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. ही महिला खोटं बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण हे फोटो डीलिट केल्याचे अनुवत यांनी सांगितलं.

अनुवत यांना यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनाही सर्व स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये अनुवत यांच्याविरोधात कोणताही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणासंदर्भात कोणाही अनुवत यांच्याविरोधात तक्रार नोंदवली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. सभागृहाचे अध्यक्ष चुआन लिकपाई यांनी हे प्रकरण खासगी असल्याचे सांगत याचा खासदाराच्या कामाशी संदर्भ जोडण्यात येऊ नये असंही म्हटलं आहे.