Thalapathy Vijay TVK Win prediction in GOAT movie car number plate: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल अतिशय वेगळा लागला असून पाच दशकाहून अधिक काळ असलेली द्रमुक पक्षांची मत्तेदारी यंदा मोडीत निघाली. तमिळ अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखरच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. विजयला तमिळनाडूत थलपती (कमांडर) म्हटले जाते. सर्वाधिक जागा जिंकणारा विजय मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. दरम्यान त्याच्या एका गाडीचा नंबर आता व्हायरल होत आहे.
दोन वर्षांपूर्वी विजयने आपल्या पक्षाची स्थापना केली होती. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये पक्षाची पहिली जाहीर सभा घेतली. दीड वर्षांपासून विजय राजकारणात सक्रिय होता. अतिशय कमी कालावधीत विजयने जोरदार कामगिरी केली आहे.
विजयच्या निवडणूक विजयानंतर आता त्याचे चाहते विजयच्या चित्रपटातील काही प्रसंगाचा दाखला दिला जात आहे. विजयने आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला रोमँटिक चित्रपट केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो राजकीय भाष्य करणारे चित्रपट निवडत होता. त्याच्या काही चित्रपटातून तो २०२६ साली तमिळनाडूचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सूचित केले गेले होते. आता निकालानंतर या प्रसंगाचा संबंध जोडला जात आहे.
२०२४ साली प्रसिद्ध झालेल्या गोट (GOAT) चित्रपटातील एका प्रसंगाची चर्चा आता होत आहे. या चित्रपटात विजय ज्या गाडीत बसलेला आहे, त्या गाडीचा नंबर चर्चेत आहे. या नंबर प्लेटवर TN 07 CM 2026 असा गाडीचा नंबर दिसतो. त्यामुळे विजय २०२६ ची तयारी फार पूर्वीपासून करत होता, हे आता सांगितले जात आहे. विजयच्या चाहत्यांना गोटमधील हा प्रसंग आता खरा झाल्याचा आनंद होत आहे
फक्त गोट नाही तर विजयच्या अनेक चित्रपटांमध्ये राजकीय भाष्य आणि राजकीय पार्श्वभूमी असल्याचे दाखवले गेले. विजयच्या थलाईवा या चित्रपटात ‘आता नेतृत्वाची वेळ आली आहे’, असा संवाद आहे. त्यानंतर मर्सल, बिगिल आणि सरकार अशा चित्रपटातून राजकीय भाष्य करण्यात आले.
एमजीआर आणि जयललिता यांच्याप्रमाणेच तमिळनाडूचा मुख्यमंत्री होण्यासाठी विजयचे प्रयत्न सुरू होते, हे उघड झाले आहे. राजकारणात येत असताना विजयने चित्रपटातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्याने लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केला आहे.
