खाण्याच्या ठिकाणी एखादा उंदीर दिसला तर किती किळस वाटतो आपल्याला. पण याच उंदरांना सोबत घेऊन कॉफी वगैरे प्यायला तुम्हाला सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? आता हे ऐकून अंगावर काटा आला असेल. तोंडही वेडीवाकडी झाली असतील. उंदरांसोबत कॉफी घ्यायची म्हणजे किती किळसवाणा प्रकार आहे हा! पण काही लोकांना असं अजिबात वाटतं नाही बरं का! अशा लोकांसाठी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये लवकरच एक कॅफे सुरू होणार आहे. या कॅफेचे नाव असणार आहे ‘द ब्लॅक रॅट कॅफे’.

अर्थात कॅफेच्या नावाप्रमाणे इथे माणसांसोबत तुमच्या आजूबाजूला वावरणार आहेत ते उंदीर. या कॅफेत बसून कॉफी, पेस्ट्रीचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता. आता कॉफी पिता पिता इथल्या उंदरांपैकी एखादा उंदीर तुम्हाला आवडला तर त्याला घरीही घेऊन जाऊ शकता. हा कॅफे सुरू करण्यामागे एक उद्देश आहे. ‘रैट्टि रॅट्ज’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेकडे पाळीव उंदीर आहेत. उंदरांना दत्तक घ्यावे यासाठी शक्कल लढवत हा कॅफे सुरू करण्यात आला. जुलै महिन्यात फक्त एका आठवड्यासाठी हा कॅफे सुरू करण्यात येणार असून अनेक प्राणीप्रेमी इथले पाळीव उंदीर दत्तक घेऊन शकतात.