एक असं विमान जे इमर्जन्सीमुळे १९९१ मध्ये नागपुरात उतरलं, पण तब्बल २४ वर्षे उडालंच नाही; वाचा कारण काय?

काही वर्षांपूर्वी नागपूर विमानतळावर देखील असंच एक पाहुणं विमान आलं होतं. हे बोइंग ७२० विमान १९९१ मध्ये त्याच्या इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे इमरजेन्सीत नागपूर विमानळावर उतरले होते. पण ते विमान पुन्हा नागपुरातून परत गेलेच नाही.

airplane-boeing
(प्रातिनिधीक छायाचित्र)

नको असलेले पाहुणे नेहमीच त्रास देतात, विशेषत: जेव्हा ते जास्त थांबतात. काही वर्षांपूर्वी नागपूर विमानतळावर देखील असंच एक पाहुणं विमान आलं होतं. हे बोइंग ७२० विमान १९९१ मध्ये त्याच्या इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे इमरजेन्सीत नागपूर विमानळावर उतरले होते. पण ते विमान पुन्हा नागपुरातून परत गेलेच नाही. बोईंग ७२० विमानाने खासगी हातांमध्ये जाण्यापूर्वी अनेक विमान कंपन्यांसाठी व्यावसायिकपणे उड्डाण केले होते. पण या विमानाची तब्बल २४ वर्ष नागपूर विमानतळावर पडून राहण्यामागची कहानी चांगलीच रंजक आहे.

२१ जुलै १९९१ रोजी बोईंग ७२० हे विमान नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानाने इंजिनच्या समस्यांमुळे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती आणि ती मंजूर झाली. कॉन्टिनेंटल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या (सीएपीएल) मालकीचे हे विमान त्यावेळी प्रायव्हेट जेट म्हणून कार्यरत होते. सामान्यतः अशा कारणांमुळे ज्या विमानांचं लँडिंग केलं जातं ती विमानं दुरुस्त करून परत पाठवली जातात. मात्र, दुर्दैवाने या विमानासोबत तसं काहीच घडलं नाही आणि ते नागपूर विमानतळाच्या धावपट्टीजवळ सोडून देण्यात आले. काही दिवस, काही महिने असं करता करता हे विमान २०१५ पर्यंत म्हणजेच तब्बल २४ वर्ष या विमानतळावर पडून राहिलं.

या विमानाच्या नागपुरात पडून राहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या मालकाला हे जुनं विमान परत नेण्यात काही रस नव्हता. दरम्यान, बराच काळ पडून राहिल्यामुळे पार्किंगचा दंड बसत होता, मात्र, सीएपीएलने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. कायदेशीर वादामुळे बोईंग ७२० चा नागपूर विमानतळावरील मुक्काम वाढला. त्यानंतर हवाई वाहतूक वाढल्याने हे विमान नागपुरात अडचणीचं ठरू लागलं. त्यामुळे १९९३मध्ये हे विमान धावपट्टीपासून अवघ्या ९० मीटर दूर हलवण्यात आले होते. डीजीसीएने अनेकदा सूचना देऊनही नागपूर विमानतळाच्या मालकांनी जेटला वेगळ्या ठिकाणी हलवण्यास नकार दिला. डीजीसीएने विमानतळाचा परवाना रद्द करण्याचा प्रयत्न केल्यावर, विमान रनवेपासून ६०० मीटर दूर हलवण्यास २०११चा जुलै महिना उजाडावा लागला. हे विमान अमेरिकेत राहणाऱ्या एनआरआय सॅम वर्मा यांच्या मालकीचे होते.

अखेर २०१५मध्ये नागपूर विमानतळाने या विमानाला धावपट्टीजवळून हटवण्याचा निर्णय घेतला आणि दोन नवे टायर टाकून हे काम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण झाले. २९ सप्टेंबर रोजी हे बोईंग विमान विमानतळावरून नागपूर फ्लाइंग क्लबला पाठवण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The boeing 720 plane landed at nagpur airport 24 years ago but never took off know the story hrc