सर्च इंजिन गुगल नेहमी एखादा खास दिवस असेल तर डूडल तयार करतो आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तर आज गुगलने त्यांच्या युजर्सबरोबरच्या २५ वर्षांच्या प्रवासाचे अनोख डूडल तयार केले आहे, ज्याचे एका मजेशीर गेममध्ये रूपांतर होताना दिसते आहे. गुगल वापरकर्त्यांना “सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टी” एक्सप्लोर करण्यासाठी हे खास डूडल तयार करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांत सर्च बारमध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्ती, ठिकाणे, लँडस्केप आदी बऱ्याच गोष्टी या खेळात आहेत. हा उपक्रम गुगलच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनचा एक भाग आहे.

सगळ्यात पहिला तुम्ही गुगल क्रोम हा ॲप उघडा. त्यानंतर जिथे तुम्ही एखादी माहिती शोधण्यासाठी मजकूर लिहिता, त्याच्या अगदी वर तुम्हाला हे खास डूडल दिसून येईल. तिथे गुगल (Google) असे इंग्रजी अक्षरात लिहिले असेल. तसेच खास गोष्ट अशी की, गुगल (Google) असे इंग्रजीत लिहिलेल्या अक्षरांवरुन सूक्ष्मदर्शक भिंग फिरवले जात आहे. तसेच गुगल मधील दोन्ही ओ (oo) अक्षरांच्या जागी २५ असे इंग्रजी अंकात लिहिण्यात आले आहे.यावर तुम्ही क्लिक केलं की, तुमच्या स्क्रिनवर प्ले ग्राउंड (Play Ground ) असे लिहिलेले दिसेल आणि हा अनोखा खेळ सुरु होईल. तसेच डावीकडे क्लिक केल्यावर तुम्हाला संगीत, कला आणि विज्ञान, खेळ, संस्कृती, प्रवास असे काही पर्याय दिसतील. या पर्यायाच्या खाली वस्तू, जागा, ठिकाण, इमोजी आदी गोष्टींच्या यादी तुम्हाला दिसून येतील. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रात ती गोष्ट शोधून दाखवायची आहे. तसेच या सगळ्या वस्तू, खाण्याचे पदार्थ आणि आणखीन बरंच काही आतापर्यंत युजर्सनी सर्च केलेल्या आहेत; जे गुगलने या खास खेळातून दाखवल्या आहे.

हेही वाचा…आयुष्यात एकदा तरी भारतातील ‘या’ पाच रेल्वेमार्गांनी करा प्रवास; मिळेल पृथ्वीवर स्वर्ग पाहिल्यासारखा आनंद

पोस्ट नक्की बघा :

त्यानंतर गुगलने त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ज्याची सुरुवात नील आर्मस्ट्राँग यांच्या चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यापासून ते ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक शोधले गेलेला ॲथलीट, विराट कोहली हा सर्वाधिक शोधला गेलेला क्रिकेटर, बार्बी बाहुली या सारखे ट्रेंडसुद्धा या व्हिडीओत नमूद करण्यात आले आहेत. “१ सर्च बार, ९१२५ दिवस आणि २५ वर्षे लाखो क्षण एकत्र शेअर केल्याचे”, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ गुगलच्या अधिकृत @GoogleIndia एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो अनेकांचं मन जिंकत आहे…