सलीम आणि अनारकली यांची प्रेमकहाणी खूपच प्रसिद्ध आहे. आजच्या काळातही त्यांच्या प्रेमाचे दाखले दिले जातात. अशातच मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात सलीम आणि अनारकलीच्या प्रेमकथेची पुनरावृत्ती होत आहे. मात्र या दोघांमध्ये उद्यान व्यवस्थापन मुघल-ए-आझमची भूमिका निभावताना दिसतंय. पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे.

२०१८ साल पासून बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य हत्ती राहण्यास आले आहेत. या व्याघ्र प्रकल्पात एकूण १४ पाळीव हत्ती आधीपासूनच वास्तव्यास आहेत. हे पाळीव हत्ती उद्यापन व्यवस्थापनासह वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. मात्र या वन्य हत्तींच्या येण्यामुळे प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यातच सलीम नावाचा वन्य हत्ती पाळीव हत्तींपैकी सर्वांत महत्त्वाची असणाऱ्या अनारकली या हत्तीणीच्या प्रेमात पडला आहे.

उद्यान व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, जेव्हाही वन्य आणि पाळीव हत्ती एकमेकांसमोर यायचे तेव्हा दोन्ही गटांचे वर्तन सामान्य होते. त्यांच्या वागण्यात कोणताही बदल झालेला दिसत नव्हता. मात्र गेल्या एक महिन्यापासून एक वन्य हत्ती, ज्याला उद्यान व्यवस्थापनाने सलीम असे नाव दिले आहे, तो उद्यानातील सर्वात प्रसिद्ध हत्ती अनारकलीच्या प्रेमात पडला आहे. सलीम नेहमी अनारकलीला भेटण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी तो पार्क व्यवस्थापनाने उभारलेल्या हत्तींच्या छावणीतही पोहोचतो.

एअर होस्टेसने फ्लाईटमध्ये ‘असं’ केलं गोंडस बाळाचं स्वागत; हा Viral Video जिंकेल तुमचं मन

विशेष म्हणजे सलीमचे अनारकलीवर इतके प्रेम आहे की छावणीत पोहोचल्यावर तो तिला मागून धक्का देत जंगलाच्या दिशेने ढकलतो. ही घटना अनेकवेळा घडली आहे. ही बाब व्यवस्थापनाच्या लक्षात येताच अधिकारी संपूर्ण जंगलात अनारकलीला शोधतात आणि तिला पुन्हा छावणीत घेऊन येतात. त्यामुळेच असे वाटते की उद्यान व्यवस्थापन या सलीम-अनारकलीच्या प्रेमाच्या आड येत आहे.

बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे एसडीओ सुधीर मिश्रा सांगतात की, वन्यजीव तज्ज्ञांनुसार ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळेच वन्य हत्ती सलीमला बांधवगडची पाळीव हत्ती अनारकली आवडली असून तो तिच्यासोबत जंगलात मुक्तपणे फिरायला उत्सुक आहे. त्याचवेळी, मुघल-ए-आझम या चित्रपटात ज्याप्रकारे सलीम आणि अनारकलीच्या प्रेमाला राजा अकबरचा विरोध होता, त्याच प्रमाणे आता हे उद्यान व्यवस्थापन आपल्या अनारकलीला वाचवण्याचा आणि तिला सुरक्षित ठेवण्याचा अथक प्रयत्न करत आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई पोलिसांचं भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनीच केलं शेअर; पाहा गाण्याचा Video

या उद्यानासाठी अनारकली अतिशय महत्त्वाची हत्तिण आहे. याचं कारण म्हणजे बांधवगडमधील सर्वात जुन्या हत्तींमध्ये गौतमनंतर अनारकलीचे नाव येते. तिचा जन्म १९६४ साली झाला आणि १९७८-७९ साली बिहारमधील सोनपूरच्या जत्रेतून उद्यान व्यवस्थापनाने तिला विकत घेतले. या ५८ वर्षीय अनारकलीने २०१२ पासून दोन नर आणि दोन मादी अशा एकूण चार पिल्लांना जन्म दिला. बांधवगडमधील पाळीव हत्तींची संख्या वाढवण्यामध्ये तिचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच पार्क व्यवस्थापन अनारकलीला आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या हत्तींचा वंश वाढवण्यात अनारकली अजूनही हातभार लावू शकते. अशा स्थितीत अनारकलीला सलीमसोबत जंगली हत्तींच्या मुक्त संचारात सोडणे उद्यान व्यवस्थापनासाठी तोट्याचे ठरेल.