आपल्यापैकी प्रत्येकजण हॉटेलमध्ये नक्कीच गेला असेल. हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बिल भरताना आपण वेटरला टीप म्हणून काही पैसे देतो. जवळपास सगळ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे. मात्र युनायटेड स्टेट्समध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे. पेनसिल्व्हेनियाच्या अल्फ्रेडोज पिझ्झा कॅफेने स्क्रॅंटनमधील एका अमेरिकन व्यक्तीवर खटला भरला आहे. यामागचं कारण मात्र अतिशय विचित्र आहे. या व्यक्तीने एका वेट्रेसला तीन हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास २.४ लाखांची टीप दिली. यानंतर कॅफेने संबंधित व्यक्तीच्या विरोधात खटला दाखल केला आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना जूनमध्ये घडली होती. एरिक स्मिथ नावाचा ग्राहक अल्फ्रेडन कॅफेमध्ये आला. त्याने स्ट्रॉम्बोली नावाची डिश ऑर्डर केली. त्याला ही डिश आणि त्या रेस्टॉरंटची सेवा खूप आवडली. यावेळी त्याचे जेवणाचे एकूण बिल फक्त १३.२५ डॉलर म्हणजेच १,०५६ रुपये झाले. त्याने हे बिल भरले तसेच वेट्रेस मारियाना लॅम्बर्टला तीन हजार डॉलर म्हणजेच सुमारे २.४ लाख रुपये टिप म्हणून दिले. एवढी मोठी टीप चुकून दिल्याचा संशय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला आला. पण, जेव्हा स्मिथने क्रेडिट कार्डने टीप दिली तेव्हा व्यवस्थापक निश्चिंत झाला. लॅम्बर्टसाठी ही टीप खरोखरच अविश्वसनीय होती. तिचा आनंद मात्र फार काळ टिकला नाही.

आत्मनिर्भर पुणेकर तरुणी श्रीमंतांच्या यादीत! एकूण संपत्ती आहे १३ हजार ३८० कोटी

काही दिवसांनंतर एरिकने रेस्टॉरंटला टीपमध्ये दिलेले २.४ लाख रुपये परत करण्यास सांगितले. तो म्हणाला की त्याने ही टीप येशूच्या सोशल मीडिया मोहिमेसाठी दिली आहे, वैयक्तिकरित्या वेट्रेस लॅम्बर्टला नाही. ऑगस्टमध्ये, रेस्टॉरंटला कळले की एरिक त्याची टीप परत मागत आहे. मात्र, तोपर्यंत रेस्टॉरंटने लॅम्बर्टला टीपचे २.४ लाख रुपये दिले होते. दरम्यान, रेस्टॉरंटने एरिकशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. परिणामी, रेस्टॉरंटने हे प्रकरण आता न्यायालयात नेले आहे.

रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की, ग्राहकाने हे पैसे टिपमध्ये दिले होते आणि तेही क्रेडिट कार्डने दिले होते. रेस्टॉरंटने हे पैसे वेट्रेसला दिले आहेत. त्यामुळे आता ते हे पैसे ग्राहकाला परत करू शकत नाही. टीप परत मागितल्याबद्दल रेस्टॉरंटने आता ग्राहक एरिकवर न्यायालयात दावा दाखल केला आहे. रेस्टॉरंट मॅनेजर जेकबसन सांगतात की लॅम्बर्ट दोन वर्षांपासून इथे काम करत आहे. या टिपचा त्याला खूप फायदा झाला आहे.