आजकाल अनेक मुलं लग्न ठरत नसल्याच्या तक्रारी करत आहेत, अशा अनेक मुलांना आपण पाहिलं आहे. पण स्वता:चं लग्न ठरत नाही म्हणून एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना मारहाण केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नक्कीच नाही असंचं तुमचं उत्तर असेल, पण सध्या राजस्थानमधील बांसवाडा येथील एका तरुणाने लग्नासाठी चक्क आपल्या वयस्कर वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव शंकर यादव असं आहे. त्यांचा मोठा मुलगा गुजरातमध्ये काम करतो आणि लहान मुलगा घरीच असतो. लहान मुलाला लग्नाची घाई झाली आहे, शिवाय वडील लग्न लावून देत नाहीत, मुलगी पाहात नाहीत याचा राग मनात ठेवत त्याने वडिलांना मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बांसवाडा जिल्ह्यातील अरथुना भागातील ओडवाडा गावाशी संबंधित आहे. शंकर यादव यांचा १८ वर्षाचा लहान मुलगा वारंवार लग्न करा असं वडिलांना सांगत असतो. लग्नाच्या मुद्यावरच बोलत असताना मुलगा अचानक एवढा संतापला की त्याने वडिलांना बेदम मारहाण केली. शिवाय त्याने केलेल्या या मारहाणीत त्याच्या वडीलांचे नाक देखील तुटले आहे.




हेही पाहा- लग्न समारंभात शंख आणायला विसरले भटजी, ऐनवेळी केला भन्नाट जुगाड, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल
मुलाने वडिलांना मारहाण केली तेव्हा ते दोघेच घरामध्ये होते. यावेळी मुलाने लग्नासाठी हट्ट धरला आणि वडिलांना “माझे लग्न करून द्या, तुम्हाला वाट्टेल ते करा, पण मला मुलगी शोधा आणि माझे लग्न करून द्या” असं म्हणत त्याने वडिलांना मारहाण केली. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. रात्री उशिरा नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर त्यांनी शंकर यादव यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
मारहाण झालेल्या व्यक्तीच्या बहिण म्हणाली, “या वयात माझा भाऊ मुलगी कुठे शोधेल? हरीश दारूच्या नशेत मारहाण करतो आणि लवकरच लग्न करा असं म्हणतो. त्यामुळे दारु पिणाऱ्याला आपली मुलगी कोण देईल?” दरम्यान, मारहाण झालेल्या शंकर यादव यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या नाकाला ६ टाके पडले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.