इक ओंकार सतनाम, करक परखु निरभऊ | निरबैर, अकाल मूरति, अजूनी सैभं गुर प्रसादि | गुरु नानकांनी समाजाला दिलेला सगळ्यात महत्त्वाचा संदेश. 'ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे. आपला कर्ता, धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे, त्यामुळे प्रत्येकांशी आपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे'. गुरू नानकांच्या संदेशाचा सार सांगण्याचा हेतू असा की आज 'गुरूनानक जयंती' आहे. शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू नानक देव यांचा आज जन्मदिवस आहे. आजचा दिवस शिखधर्मियांसाठी पवित्र मानला जातो. गुरु नानक यांची आज ५४७ वी जयंती आहे. गुरू नानक यांचा जन्म १४६९ मध्ये पंजाबमध्ये झाला. सध्या हा भाग पाकिस्तानात येतो. संसारात रमलेले गुरू नानक वयाच्या ३० व्या वर्षी अध्यात्म यात्रेला निघाले. देव हा एक आहे आणि त्याच्या दारात कोणताही भेदभाव नसतो. देवासाठी सगळे समान असतात आणि त्याच्यासाठी कोणी स्पृश्य, अस्पृश्य नसतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता, म्हणूनच त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि ते शिखांचे पहिले गुरू बनले. १५ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आहे. पण हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवशी अनेक शीख भाविक पाकिस्तानात त्यांच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतात. भजनाद्वारे गुरू नानकांची महिती गायली जाते. आजच्या दिवशी शीख भाविक एकत्र येऊन सर्वांसाठी जेवण बनवतात. हजारो भाविक लंगरमध्ये पोटभर जेवतात. लंगरमध्ये गरीब, श्रीमंत, उच्च - निच्च असा भेदभाव नसतो. देवाच्या दारी सगळेच सारखे असतात यावर त्यांचा विश्वास आहे.