देशभरातील वेगवेगळ्या शहरांमधील पोलीस खात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांच्या तक्रारी सोडवण्याबरोबरच जनजागृतीची कामंही सुरु केली आहेत. अगदी मुंबईपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून मणिपूरपर्यंत अनेक राज्यांमधील पोलिसांची खाती ही सोशल मीडियावरुन हटके स्टाइलमध्ये जनजागृती करत असल्याचं चित्र पहायला मिळतं. मात्र कधीकधी या खात्यांवरुन अशापद्धतीच्या पोस्ट आणि उत्तरं दिली जातात की ज्यामुळे लोकांच्या ज्ञानात नव्याने भर पडते. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये घडला.

नक्की वाचा >> …अन् दुबईच्या राजकुमाराने Viral Video मधील त्या डिलेव्हरी बॉयला फोन करुन म्हटलं ‘Thank You’; जाणून घ्या काय घडलं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरुमधील एका व्यक्तीने रस्त्याच्याकडेला लावण्यात येणाऱ्या वाहतुकीसंदर्भातील फलकावर एक अगदीच वेगळं चिन्ह पाहिलं. या चिन्हामध्ये पांढऱ्या रंगाच्या पाटीवर चार काळे गोळे काढण्यात आलेले. म्हणजेच पुढे गतिरोधक आहे, शाळा आहे किंवा वेग मर्यादा दर्शवणाऱ्या फलकाप्रमाणे हा फलक लावण्यात आलेला. मात्र या फलकाचा नेमका अर्थ काय हे न कळाल्याने या व्यक्तीने त्याचा फोटो काढून ट्विटरवरुन पोस्ट केला. अनिरुद्ध मुखर्जी नावाच्या व्यक्तीने ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो शेअर करत या चिन्हाचा नेमका अर्थ काय होतो अशी विचारणा थेट पोलिसांकडे केली.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

“हे वाहतुकीसंदर्भातील कोणतं चिन्ह आहे? होपफार्म सिग्नलजवळ हे चिन्ह लावण्यात आलं आहे,” अशा कॅप्शनसहीत अनिरुद्ध यांनी हा फोटो शेअर करत वाहतूक पोलिसांचं ट्विटर हॅण्डल टॅग केलं होतं.

या ट्विटला व्हाइटफिल्ड वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रिप्लाय केला. पोलिसांनी या चिन्हाचा अर्थ सांगताना, दृष्टीहीन लोकांना रस्त्यावर सुरक्षित प्रवास करण्यासंदर्भातील हे चिन्हं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. “हे चिन्ह सतर्कतेचा इशारा देणारं आहे. यामधून दृष्टीहीन व्यक्ती रस्त्यावर असू शकते असं सूचित केलं जातं. सावकाश गाडी चालवा असं यामधून निर्देशित करण्याचा हेतू असतो,” असं ट्विट पोलिसांनी केलं. म्हणजेच दृष्टीहीन लोकांची ये-जा ज्या ठिकाणी अधिक असते अशा ठिकाणी हे चिन्ह वापरलं जातं. म्हणूनच होपफार्म सिग्नलजवळ असणाऱ्या अंध व्यक्तींच्या शाळेजवळ हा फलक लावण्यात आला आहे. दृष्टीहीन लोक रस्त्यावर प्रवास करत असून वाहनचालकांनी वाहने या लोकांची काळजी घेत चालवावीत अशा अर्थाने हे चिन्ह लावण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

या उत्तरावरुन दोन मतप्रवाह दिसून येत असून काहींनी पोलिसांचं यासाठी कौतुक केलं आहे तर काहींनी हे चिन्ह अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना पटकन कळेल असं ठेवता आलं असतं असं म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is what new signboard outside blind school in bengaluru means scsg
First published on: 08-08-2022 at 13:43 IST