Litile Girl Dance Viral Video : आपल्या खास अदाकारी आणि ठसकेबाज स्टाईलमुळे वेगळी ओळख निर्माण करणारी Gautami Patil हिची गाणी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड होत आहेत. तिच्या “सुंदरा” या गाण्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. या गाण्यावर हजारो जण रिल्स बनवत असताना, आता एका चिमुकलीने असा जबरदस्त डान्स केला आहे की, अनेक नेटकरी “गौतमी पाटीलपेक्षाही ही चिमुकली भन्नाट नाचतेय!” अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. “ह्या पोरीचा नखरा भारी” असे म्हणत या लहान मुलीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर world_of_raajnandini_official या खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये ही चिमुकली “सुंदरा” या गाण्यावर आत्मविश्वासाने आणि उत्साहाने डान्स करताना दिसते. गाण्याच्या तालावर तिने केलेल्या अचूक स्टेप्स आणि चेहऱ्यावरील सुंदर एक्सप्रेशन्स पाहून अनेकजण तिच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे तिच्या डान्समधील नखरा, एनर्जी आणि टायमिंग इतके अचूक आहे की, व्हिडीओ पाहताना अनेकांना गौतमी पाटील हिची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

सध्या सोशल मीडियावर गाजत असलेले “सुंदरा” हे नवीन मराठी डान्स साँग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. या गाण्यात गौतमी पाटील आणि निक शिंदे यांच्यावर अफलातून नृत्य चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे रोहीत राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी गायले असून, त्याला रोहित नागभिडे यांनी संगीत दिले आहे. गाण्याचा जोशपूर्ण ताल आणि आकर्षक बीट्समुळे अनेकजण या गाण्यावर रिल्स तयार करताना दिसत आहेत.

“ह्या पोरीचा नखरा भारी” असे भन्नाट कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तिच्या निरागस हावभावांनी नेटकऱ्यांना अक्षरशः भुरळ घातली आहे. या चिमुकलीच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे. “खूप गोड डान्स”, कमी वयात मोठं कौशल्य मिळवले आहे तिने ” अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचे अभिनंदन केले आहे. काहींनी तर ही चिमुकली भविष्यात मोठी डान्सर बनेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिलेले नाही, तर अनेकांना आपले कौशल्य दाखवण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. अशा व्हिडीओमुळे लहान मुलांमधील दडलेली कला जगासमोर येत असून, त्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. सध्या “सुंदरा” गाण्यावरचा हा चिमुकलीचा डान्स व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.