एखाद्या पदार्थाला त्या जागेचे नाव देणे किंवा त्या व्यक्तीचे नाव देणे काही नवीन नाही. जो या पदार्थाची पाककृती बनवतो साधरण त्याचे नाव या पदार्थाला दिले जाते किंवा ज्या ठिकाणी ही पाककृती तयार होते तेथील खासियत म्हणून पदार्थांची नावे प्रचलित होतात. माहिम हलवा, म्हैसूर पाक यासारखी अनेक उदाहरणे आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक हॉटेल चांगलेच गाजते आहे. या हॉटेलने आपल्या मेन्यू कार्डमध्ये नवा पदार्थ आणला आहे. या पदार्थाचे नाव आहे ‘डोनाल्ड ट्रम्प व्हाईट डोसा’. हे ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारला असला तरी हे खरे आहे. चेन्नईमधल्या सुप्रभा हॉटेलने आपल्या हॉटेलच्या पदार्थांच्या यादीत या नव्या पदार्थाचा समावेश केला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ८ नोव्हेंबरला पार पडली. यात डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठरले. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेपेक्षित यशाने जरी जगाला मोठा धक्का बसला असला तरी भारतात अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.  नागपूरही येथेही ट्रम्प यांची विजयी रॅली काढण्यात आली होती. चेन्नईतल्या चाणक्य नावाच्या माशाने डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार असे भाकित वर्तवले होते आणि ट्रम्प यांच्या विजयाने त्याचे भविष्य खरे ठरले. तेव्हा चेन्नईचा हा चाणक्य चर्चेत आला. आता चेन्नईल्या एका हॉटेलने डोनाल्ड ट्रम्प डोसा आणल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चेन्नई आणि काही चेन्नईवासीयांचे ट्रम्प प्रेम चर्चेत आले आहे.