भारतीय बॅडिमटन आणि एकंदर क्रीडा क्षेत्र प्रगतिपथावर असल्याचा प्रत्यय १५ मे २०२२ रोजी पुन्हा एकदा आला. भारतीय पुरुष बॅडिमटन संघाने १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले. या विजयानंतर सर्वच स्तरामधून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही या संघाचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं. मात्र या ट्विटवरुन एक नवाच संवाद सुरु झाला अन् त्यावर आनंद महिंद्रांनी त्यांच्या पत्नीसंदर्भातील एक खास गोष्ट एका ट्विटला रिप्लाय देताना सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झालं असं की आनंद महिंद्रा यांनी थॉमस चषक जिंकल्यानंतर एक ट्विट केलं. “या खेळामध्ये भारताचं वर्चस्व राखण्याचा ही सुरुवात आहे. हा खेळ आपल्या देशात कायमच फार प्रिय राहीला असून तो देशभरात खेळला जातो. मी थॉमस कपबद्दल वाचत मोठा झालो. इंडिनेशियातील रबी हार्टोनोसारख्या खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवलीय. आज आपण इंडोनेशियाला पराभूत केलं. आपना टाइम आ गया”, असं आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं. यामध्ये त्यांनी तिरंग्याचा इमोजी सुद्धा वापरलेला.

आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर थॉमस चषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असणारा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने रिप्लाय दिला. त्याने आनंद महिंद्रांचे आभार तर मानलेच. पण त्याने बूक केलेली एक्सयुव्ही ७०० ही गाडी कधीपर्यंत मिळेल याबद्दलही याच ट्विटमध्ये थेट आनंद महिंद्रांकडे चौकशी केली. २३ वर्षीय चिरागने, “धन्यवाद सर! मी नुकतीच एक्सयुव्ही ७०० बूक केलीय. मला अपेक्षा आहे की ती मला लवकर मिळेल,” असा रिप्लाय आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर दिला.

आनंद महिंद्रांनी चिरागच्या ट्विटची दखल घेत त्याला लवकरात लवकर गाडी मिळेल यासंदर्भात काळजी घेतली जाईल असं सांगितलं. मात्र त्याचवेळी आनंद महिंद्रांनी स्वत: त्यांच्या पत्नीसाठी एक्सयूव्ही ७०० बूक केल्याची माहिती दिली. इतकच नाही तर पत्नीसाठी बूक केलेल्या या गाडीसाठी आपणच वेटींगमध्ये असल्याचंही आनंद महिंद्रा सांगायला विसरले नाहीत.

“एक्सयुव्ही ७०० ही चॅम्पियन्सची पहिली पसंती असल्याने ती तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यासाठी आम्हाला जास्त काम करावं लागेल,” असं महिंद्रांनी चिरागला रिप्लाय देताना म्हटलेलं. पुढे त्यांनी त्यांच्या कंपनीमधील विजय नारका नावाच्या अधिकाऱ्याला टॅग करुन तुम्ही हे ट्विट पाहिलं असेल अशी अपेक्षा करतो, असं म्हटलं. या ट्विटच्या शेवटी आनंद महिंद्रांनी, “बाय द वे, मीच माझ्या बायकोसाठी एक (महिंद्रा एक्सयुव्ही ७००) ऑर्डर केलीय. पण मी सुद्धा रांगेत आहे,” असंही म्हटलंय. “वाईट गोष्ट ही आहे की जागतिक पुरवठा साखळीला फटका बसल्याने सर्व कार उत्पादक कंपन्यांवर परिणाम झालाय,” असंही आनंद महिंद्रांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, चिरगने अशापद्धतीने रिप्लाय करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. थॉमस चषक जिंकल्यानंतर एअर इंडियाने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. त्यावर रिप्लाय करताना चिरागने आम्हाला मायदेशी जाण्यासाठी एअर इंडियाचं विमान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा आशयाचं ट्विट केलेलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thomas cup winner chirag shetty asks anand mahindra for his booked xuv700 check out his reply scsg
First published on: 23-05-2022 at 16:17 IST