लॉकडाउनमध्ये वाढली माकडांची संख्या; हल्ल्यांच्या दहशतीने ‘या’ शहरातील अनेकांनी केलं पलायन

जगभरातील नागरिक येथे पर्यटनासाठी यायचे तेव्हा ते माकडांना खाण्यापिण्याच्या गोष्टी द्यायचे. मात्र करोना निर्बंधांमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली.

monkey thailand
थायलंडमधील शहरात माकडांची दहशत (प्रातिनिधिक फोट सौजन्य रॉयटर्स)

करोनाने जगभरामध्ये थैमान घातलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये करोनामुळे हाहाकार उडालाय. भारतामध्येही करोनाची तिसरी लाट आल्याचं सांगण्यात येत आहे. देशात रोज लाखो करोना रुग्ण आढळून येतायत. करोनाचा जितका मानवावर परिणाम झालाय तितकाच प्राण्यावरही झालाय. पर्यटन बंदी, लॉकडाउन अशा गोष्टींमुळे लोक घरात अडकून पडल्याने प्राण्यांचेही हाल झाले आहेत. मात्र थायलंडमधील एका शहरामध्ये अगदीच वेगळी परिस्थिती दिसून येत आहे. या ठिकाणी करोना साथीच्या कालावधीमध्ये माकडांची संख्या भरमसाठ वाढलीय. धक्कादायक बाब म्हणजे ही संख्या एवढी वाढलीय की त्याचा फटका गावकऱ्यांना बसलाय.

थायलंडमधील लॉपबुरी शहरामध्ये मकाक्स प्रजातीच्या माकडांनी हौदौस घातलाय. येथे मागील बऱ्याच काळापासून माकडांचा आवास आहे. मात्र लॉकडाउनच्या कालावधीमध्ये माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील नागरिक येथे पर्यटनासाठी यायचे तेव्हा ते माकडांना खाण्यापिण्याच्या गोष्टी द्यायचे. मात्र करोना निर्बंधांमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली किंवा पर्यटन जवळजवळ बंदच झाले तेव्हापासून माकडांनी स्थानिकांना त्रास देण्यास सुरुवात केलीय.

नोव्हेंबरपासून येथे पुन्हा पर्यटनाला सुरुवात झालीय. त्यावेळी अनेकांना माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं. समोर आलेल्या माहितीनुसार माकडं आता घरांमध्ये घुसून लोकांवर हल्ला करताना दिसत आहेत. घरांमध्ये घुसून माकडं खाण्याच्या गोष्टींवर डल्ला मारतायत. माकडांची संख्या आणि हल्ले एवढ्या मोठ्या प्रमाणात होतायत की लोकांना घरांच्या बाहेर पडणं, रस्त्यावरुन एकट्याने प्रवास करणंही कठीण झालंय. अनेकजण तर गाव सोडून गेलेत.

माकडं घरांमध्ये घुसण्याबरोबरच दुकानांमध्येही घुसखोरी करत आहेत. खाण्याच्या गोष्टी चोरण्यासाठी माकडांमध्येच हाणामारी होताना दिसत आहेत. मागील बऱ्याच काळापासून माकडांचा माणसांशी संबंध न आल्याने त्यांना माणसांबद्दल वाटणारी भीतीही नाहीशी झालीय. ते माणसांवरच ह्लेल करुन लागलेत. २०२० साली प्रजनन नियंत्रणाच्या माध्यमातून माकडांची संख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो यशस्वी ठरला नाही. सन २०२० मध्ये आणि २०२१ च्या सुरुवातीला देशात लॉकडाउन लागला तेव्हा माकडांनी उच्छाद मांडला. खाण्यासाठी ते एकमेकांशी भांडू लागले.

सध्या या गावामध्ये माकडांच्या भीतीच्या सावटाखाली लोक जगत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thousands of monkeys terrorise thai town rival gangs battle for supremacy as they compete for food scsg

ताज्या बातम्या