Three Sisters Marry Same Man: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तीन सख्ख्या बहिणींनी एकाच पुरुषाशी मंदिरात लग्न केल्याचा दावा केल्यानंतर हा विषय देशभर चर्चेत आला आहे. या अनोख्या विवाहावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काही जणांनी समर्थन केले, काहींनी उत्सुकता व्यक्त केली, तर काहींनी या विवाहाच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्न उपस्थित केले.

हे लग्न १७ जुलै रोजी चामुंडा माता मंदिरात झाल्याचे सांगितले जात आहे. येथे सरोज (२०), सावित्री (१९) आणि संतोष (१८) या तीन बहिणींनी विकास नावाच्या तरुणासोबत विवाह केल्याचा दावा केला आहे. विकास गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत कॅमेरामन म्हणून काम करत होता.

या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या घटनेनंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, परंपरा आणि कायदा यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हिंदू परंपरेनुसार झाले लग्न

या विवाहात अनेक पारंपरिक हिंदू विधी करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. विकास तिन्ही बहिणींसोबत विवाहाचे विधी करताना दिसत आहे. तिन्ही बहिणींनी साडी नेसली असून डोक्यावर पदर घेतलेला आहे.

विवाहादरम्यान विकासने तिन्ही वधूंच्या कपाळात सिंदूर भरलं आणि तिघींसोबत अग्नीभोवती सात फेरे घेतले. विशेष म्हणजे या लग्नाला फक्त पुजारी उपस्थित असल्याचे दिसते. दोन्ही कुटुंबातील नातेवाईक किंवा मित्रमंडळी कुठेही दिसत नाहीत.

तिन्ही बहिणींनी एकाच पुरुषाशी लग्न का केले?

हसनपूरमधील धौरिया गावातील या तिन्ही बहिणी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहेत. त्यांनी सांगितले की, लग्नानंतर एकमेकींपासून दूर व्हावे लागेल, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती.

मोठी बहीण सरोजने सांगितले की, वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न करून वेगवेगळ्या घरात राहण्याची कल्पनाच त्यांना असह्य वाटत होती.

ती म्हणाली, “लग्नामुळे आम्ही वेगळ्या होणार आहोत हे समजल्यावर आम्ही आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. पण नंतर आम्ही ठरवले की, मरायचे नाही, तर एकत्र राहायचे. म्हणून आम्ही एकाच पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिघीही सज्ञान आहोत आणि हा निर्णय आमच्या इच्छेने घेतला आहे.”

तिन्ही बहिणींनी सांगितले की, त्या जन्मापासून एकत्र राहिल्या असून पुढेही त्यांना एकाच घरात राहायचे आहे.

विकास त्यांचा वर कसा बनला?

विकासने सांगितले की, तो सुमारे सहा महिन्यांपासून या तिन्ही बहिणींसोबत कॅमेरामन म्हणून काम करत होता. सोशल मीडियावरील त्यांच्या व्हिडीओंमध्ये तो अनेकदा त्यांच्या ऑन-स्क्रीन पतीची भूमिका साकारत होता.

त्याच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर वेगळे होण्याची भीती तिन्ही बहिणी वारंवार व्यक्त करत होत्या. अखेर त्यांनी त्यालाच लग्नाची मागणी घातली.

आपल्या निर्णयाबद्दल विकास म्हणाला, “त्या वारंवार सांगत होत्या की, लग्नानंतर त्यांना वेगळे राहायचे नाही. त्यांच्या भावना समजून मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला असून लोकांनी आमच्या निर्णयाचा आदर करावा, अशी आमची अपेक्षा आहे.”

सोशल मीडियावर मीम्स, प्रश्न आणि समर्थन

लग्नाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.

काहींनी या घटनेकडे विनोदी पद्धतीने पाहिले. एका यूजरने लिहिले, “मुलं म्हणत असतील- इकडे एकही मुलगी मिळत नाही, आणि हा तर थेट पॅकेज डील घेऊन फिरतोय!” काहींनी मात्र सज्ञान व्यक्तींना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत समर्थन केले.

एका यूजरने लिहिले, “अरे, त्यांची इच्छा आहे. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय घेत आहेत, मग इतरांना एवढी काय अडचण?” दुसऱ्या यूजरने म्हटले, “जर सर्वांची संमती असेल तर का नाही? मात्र त्यासाठी कायदेशीर कराराची गरज पडू शकते.” तर आणखी एका यूजरने लिहिले, “हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार हिंदूंमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करणे बेकायदेशीर आहे.”

बहिणींनी पौराणिक उदाहरण देत केला निर्णयाचा बचाव

सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर तिन्ही बहिणींनी आणखी एक व्हिडीओ शेअर करून आपल्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी हिंदू पौराणिक कथांचा संदर्भ देत, पूर्वी अनेक राजांना एकापेक्षा जास्त पत्नी होत्या, असे सांगितले.

त्या म्हणाल्या, “राजा दशरथांना तीन राण्या होत्या. तेव्हा तो अपमान मानला गेला होता का?” त्यांच्या या वक्तव्यानंतरही सोशल मीडियावर चर्चा अधिक रंगली. काहींनी याकडे वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा म्हणून पाहिले, तर काहींनी पौराणिक कथा आणि आजचा कायदा यांची तुलना होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले.