Tiger vs Rhino? Viral Video Reveals an Unexpected Twist in the Wild: जंगलातील जीवन हे नेहमीच अनिश्चिततेनं भरलेलं असतं. कधी एखादा शिकारी दबा धरून बसलेला दिसतो, तर कधी अशा घटना घडतात की, वन्यजीव अभ्यासकांनाही आश्चर्य वाटतं. सध्या सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ अशाच दुर्मीळ क्षणांपैकी एक मानला जात आहे. या व्हिडीओमध्ये जंगलातील दोन बलाढ्य आणि प्रभावी प्राणी वाघ आणि गेंडा – एकमेकांसमोर आल्याचे दिसते.

व्हिडीओची सुरुवात शांत वातावरणाने होते. एका पाणवठ्याजवळ एक गेंडा निवांत उभा असल्याचे दिसते. तो आपल्या परिसराचे निरीक्षण करत असतो. त्याच्या हालचालींमध्ये कोणतीही अस्वस्थता नसते. तो आपल्या जागी ठाम आणि आत्मविश्वासानन उभा असल्याचं स्पष्टपणे जाणवतं.

याच वेळी झुडपांमधून एक वाघ सावकाशपणे पुढे येताना दिसतो. जंगलातील सर्वांत कुशल शिकाऱ्यांपैकी एक मानला जाणारा हा वाघ परिस्थितीचा अंदाज घेत पुढे सरकत असतो. त्याची प्रत्येक हालचाल अत्यंत सावध असते.

वाघ आणि गेंडा यांच्यातील अंतर कमी होत जातं. व्हिडीओ पाहणाऱ्यांची उत्सुकता वाढते. कारण- अशा दोन ताकदवान प्राण्यांची समोरासमोर भेट झाल्याचं रोज पाहायला मिळत नाही. अनेकांना पुढच्या क्षणी एखादा संघर्ष होईल, असं वाटू लागतं; मात्र इथेच या घटनेला वेगळं वळण मिळतं.

गेंडा आपल्या जागेवरून हलत नाही. त्याच्या देहबोलीतून तो अत्यंत शांत आणि आत्मविश्वासानं उभा असल्याचं जाणवतंं. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, प्रौढ गेंडा हा जंगलातील अत्यंत शक्तिशाली प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याच्या प्रचंड आकारमान आणि ताकदीमुळे अनेक शिकारी प्राणी त्याच्याशी थेट संघर्ष करणं टाळतात.

व्हिडीओमध्येही काहीसं असंच चित्र दिसून येतं.

वाघ आणखी काही पावलं पुढे येतो; पण गेंड्याच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याचा वेग कमी होतो. तो परिस्थितीचं निरीक्षण करतो आणि काही क्षण तसाच उभा राहतो. त्यानंतर हल्ला करण्याऐवजी तो थोड्या अंतरावर जाऊन बसतो.

हा क्षणच या संपूर्ण व्हिडीओचं वैशिष्ट्य ठरला आहे.

कारण- येथे कोणताही संघर्ष होत नाही, कोणतीही झुंज रंगत नाही. त्याऐवजी जंगलातील प्राण्यांच्या वर्तनातील समजूतदारपणा आणि परिस्थितीचं अचूक मूल्यमापन करण्याची क्षमता पाहायला मिळते.

ही घटना उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यानातील असल्याचे सांगितले जात आहे. आयएएस अधिकारी व वन्यजीव छायाचित्रकार संजय कुमार यांनी हा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ हजारो लोकांपर्यंत पोहोचला आणि चर्चेचा विषय ठरला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी गेंड्याच्या शांत स्वभावाचं कौतुक केलं; तर काहींनी वाघानं दाखवलेल्या संयमाची प्रशंसा केली. अनेकांच्या मते, हा प्रसंग जंगलातील शक्ती आणि शहाणपण यांच्यातील संतुलन दाखवून देणारा आहे.

एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देताना लिहिलं की, प्रत्येक ताकदवान प्राणी प्रत्येक वेळी संघर्षच निवडतो, असं नाही. दुसऱ्यानं म्हटलं की, जंगलातील खरा अनुभव म्हणजे परिस्थितीचा योग्य अंदाज घेणं.

व्हिडीओच्या शेवटी कोणतीही लढाई होत नाही; पण तरीही हा प्रसंग पाहणाऱ्यांना खिळवून ठेवतो. कारण- येथे विजय किंवा पराभवाचा प्रश्न नसतो. जंगलातील दोन बलाढ्य प्राणी समोरासमोर येतात आणि त्या भेटीतून संघर्ष नव्हे, तर ताकद, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय यांचं अनोखं दर्शन घडतं. म्हणूनच हा दुर्मीळ व्हिडीओ सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ