Tiger Vs King Cobra Video: एका बाजूला भलामोठा साप किंग कोब्रा, ज्याच्या एकाच दंशात प्राण घेतले जातात. तो एकदा वार करताच थांबत नाही. समोरच्याला संपवल्याशिवाय माघार घेत नाही. तर दुसऱ्या बाजूला वाघ, निर्भय, बलशाली आणि जंगलाचा अस्सल पराक्रमी योद्धा, जो शेवटच्या श्वासापर्यंत लढतो. जेव्हा हे दोन भयंकर शिकारी समोरासमोर येतात, तेव्हा नुसती झुंज नसते, ती असते अस्तित्वाची लढाई. कोब्रामधली चपळ बुद्धिमत्ता की वाघामधली ताकद आणि जिद्द? काय होईल या भिडंतीचा शेवट? कोण ठरेल खरा राजा? पाहा…
सोशल मीडियावर दररोज काही ना काही असं व्हायरल होत असतं, जे पाहून थक्क व्हायला होतं. असाच एक रहस्यमय आणि थरारक व्हिडीओ सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरतोय. कारण- या व्हिडीओमध्ये वाघ आणि किंग कोब्रा, असे जंगलातील दोन सर्वांत भयानक शिकारी समोरासमोर भिडताना दिसतात..
वाघ आणि कोब्रामधली ‘जंगलातली जंग’ सुरू!
व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं की, एक वाघ जंगलात शांतपणे फेरफटका मारतोय. तेवढ्यात त्याच्या नजरेस समोरून सरपटत येणारा किंग कोब्रा पडतो. बघता बघता वाघाचं लक्ष त्या नागराजावर जातं आणि वातावरणात एकदम तणाव जाणवायला लागतो.
वाघ आपल्या पंजांनी किंग कोब्राभोवती आक्रमक कडे निर्माण करतो. तो नागराजाच्या एकेका हालचालीवर नजर ठेवत सावधपणे पुढे सरकतो. काही क्षणांतच तो संपूर्ण स्थितीवर वर्चस्व मिळवतो.
कोब्रा हार मानणाऱ्यांपैकी नाही!
दुसरीकडे किंग कोब्रासुद्धा काही कमी नाही. तो आपला फण उंचावतो, फुत्कारतो आणि वाघाला जोरदार दंश करण्याचा प्रयत्न करतो. काही सेकंदांसाठी वातावरण थांबल्यासारखं वाटतं. कारण- दोघांमध्ये कोण बाजी मारेल हे निश्चित होत नाही. वाघ त्याच्या चलाखीने किंग कोब्राचा दंश टाळतो; पण दोघांचीही प्रत्येक हालचाल अस्तित्वाचीची लढाई आहे हे स्पष्टपणे जाणवतं.
शेवटी काय झालं?
व्हिडीओमध्ये दोघांच्या संघर्षाचा नेमका शेवट काय झाला हे स्पष्ट दिसत नाही. कोण जिंकलं, कोण मरण पावलं याचा खुलासा व्हिडीओमधून होत नाही. तसेच हा व्हिडीओ नेमका कुठे चित्रित झाला किंवा तो कोणत्या जंगलातला आहे ही माहितीही समोर आलेली नाही.
येथे पाहा व्हिडीओ
नेटिझन्स म्हणतात, “नेचरचा सर्वांत खतरनाक सामना!” हा थरार पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक म्हणतायत, “हे खरं जंगल आहे… इथे नियम नाहीत. फक्त जगायचं असतं!” काही जण वाघाच्या ताकदीचं कौतुक करतायत; तर काही जण कोब्राच्या धाडसानं प्रभावित झाले आहेत.