टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्या देशभरामध्ये तसेच जगभरात कमी नाहीय. काहीजण यामधून चांगली कमाई करतात. मात्र असं करणाऱ्या अनेकांकडे योग्य प्रकारचं प्रशिक्षण नसतं. याच गोष्टीची दखल घेऊन अमेरिकेतील एका विद्यापीठाने अधिकृतपणे ऑनलाइन व्हिडीओ बनवण्यासाठीचं आणि त्या माध्यमातून पैसे कमवण्याचं कौशल्य शिवकणारं शिक्षण देणारे वर्ग सुरु केलेत.

नेमका अभ्यासक्रम कुणी सुरु केलाय…
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलॅनामधील डरहममधील ड्यूक विद्यापिठाने आपल्या कॅम्पसमध्ये हा नवीन अभ्यासक्रम सुरु केलाय. बिल्डींग ग्लोबल ऑडियन्सेस असं या अभ्यासक्रमाचं नाव आहे. मात्र सामान्य भाषेत या अभ्यासक्रमाचं नाव द टिकटॉक क्लास असं ठेवण्यात आलंय. हा अभ्यासक्रम पदवीचा अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर आपला वावर वाढवण्यासाठी या वर्गात प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

कोणं देतं धडे?
ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार या अभ्यासक्रम ड्युक्स इनोव्हेशन अॅण्ड ऑन्ट्रप्रेनिअरशीप इन्स्टीट्यूटमधील प्राध्यापक अॅरोॉन डिनिन शिकवतात. ते सोशल मार्केटींगचे तज्ज्ञ आहेत. त्यांना विद्यार्थ्यांमध्ये असणारी रुची लक्षात घेत हा अभ्यासक्रम तयार केलाय. या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यी टिकटॉकवरील ट्रेण्डशीसंदर्भात व्हिडीओ तयार करतात आणि अंतिम प्रोजेक्ट म्हणून तो आपल्या वर्गातील सहकाऱ्यांसोबत शेअर करतात. हा कंटेट कसा योग्य पद्धतीने तयार करता येईल हे या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. त्यामुळेच कोणत्या पोस्ट चांगल्या चालतील आणि कोणत्या वाईट हे समजू शकतं. विद्यार्थ्यांना खासगी ब्रॅण्ड निर्माण करण्यासाठीही मदत केली जाते.

अभ्यासाचा काय फायदा झाला?
आतापर्यंत या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी टिकटॉकवर १ लाख ४५ हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. तर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हिडीओंना ८० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत. नतालिया हॉजर नावाच्या एका विद्यार्थिनीने एका सेमिस्टरमध्ये १२ हजार फॉलोअर्स मिळवले आहेत. तिला सध्या २ लाख २७ हजार फॉलोअर्स आहेत. ती यावरुन महिन्याला ७७ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत कमाई करते. तिला अनेक ब्रॅण्ड्सकडून पोस्टसाठी पैसे दिले जातात. कंपन्यांसोबत व्यवहार कसा करावा हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं जातं.