मोमोज खायला आवडत नाहीत असा तरुण शोधून सापडणं कठीण झालं आहे. कारण आजकाल अनेक तरुणांच्या आवडत्या फास्ट फूडच्या यादीत मोमोज नेहमीच टॉपवर असतात. मित्रामित्रांमध्ये नेहमीच मजा मस्ती चालू असते, अशातच ते कधीकधी एकमेकांना वेगवेगळी चॅलेंज देतात. अनेक वेळा ही चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात काहीजण आपला जीवदेखील धोक्यात घालतात. सध्या बिहारमधील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जी वाचून अनेक मोमोजप्रेमींना धक्का बसला आहे.
हो कारण गोपालगंजच्या सिहोरवा गावातील एका तरुणाचा एकामागून एक अनेक मोमो खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोमोजमुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विपिन कुमार पासवान (२५) असं आहे. विपिनचे सिवानमधील बधरिया पोलीस स्टेशन हद्दीतील ज्ञानी मोर येथे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. मृत विपिनचे वडील विशुन मांझी यांनी सांगितले की, गुरुवारी दोन तरुण विपिनला सोबत घेऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी विपिनचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला, त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मित्रांनीच विपिनची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.




मित्रांनी मोमोज खाण्याचे चॅलेंज दिले अन् घात झाला –
असंही सांगितले जात आहे की विपिनच्या मित्रांनी त्याला मोमोज खाण्याचे चॅलेंज दिले होते. दिलेले चॅलेंज जिंकण्यासाठी विपिनने तब्बल १५० मोमो खाल्ल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. शिवाय जास्त मोमोज खाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं जात आहे. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी विपिनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. विपिनच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोमोज चावून खाणे गरजेचे –
डॉक्टर म्हणाले की, मोमोज चावून खाणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही ते योग्य प्रमाणात चावले नाही तर अचानक मृत्यूचा धोका उद्भवू शकतो. मोमोज हे मैद्यापासून बनलेले असतात, त्यामळे ते चावले नाही तर घशात अडकून मृत्यू होऊ शकतो, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.