परदेशात जाऊन आल्याची माहिती आपल्या पत्नीपासून लपवण्यासाठी पासपोर्टमधून काही पाने फाडून टाकल्याच्या आरोपाखाली एका ३२ वर्षीय व्यक्तीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. त्याला त्याचे विवाहबाह्य संबंध आपल्या पत्नीपासून लपवून ठेवायचे होते. परंतु यासाठी त्याने जे केलं आहे त्यामुळे त्याला चांगलीच अद्दल घडली आहे. पासपोर्टशी छेडछाड करणे हा गुन्हा असल्याचे त्याला माहीत नव्हते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी हा माणूस त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परदेशात गेला होता. गुरुवारी रात्री जेव्हा तो भारतात परतला तेव्हा मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की त्याच्या पासपोर्टवर नवीनतम प्रवासासाठी व्हिसाचे शिक्के असायला हवे होते, ती पाने गहाळ झाली आहेत.

ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं

पोलिसांनी चौकशी केली असता, त्या व्यक्तीने सांगितले की, आपण भारतात कामासाठी जात असल्याचे पत्नीला खोटं सांगून तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परदेशात गेला होता. जेव्हा त्याच्या पत्नीला संशय आला आणि तिने त्याला कॉल केला तेव्हा त्याने तिचे कॉल उचलले नाहीत. यानंतर पत्नीला आपल्या परदेशी दौऱ्याबद्दल कळू नये म्हणून त्याने पासपोर्टमधून पाने काढून टाकण्याचा विचार केला.

दरम्यान, संबंधित भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांअंतर्गत फसवणूक आणि बनावटगिरी या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.