वाहतूक नियमांचे उल्लंघन ही भारतातील मोठी समस्या आहे जी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस विविध उपक्रम राबवित असतात. कधी वाहतूक नियमांबाबत जागृकता निर्माण करतात तर कधी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतात. पण काही वाहनचालक इतके बेशिस्त झाले आहेत की, दंड भरावा लागला तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही.
दंडात्मक कारवाई होईल हे माहित असूनही अनेकदा हे बेशिस्त वाहन चालक कधी ट्रॅफिक सिग्नल मोडताना दिसतात तर कधी विना हेल्मेट बाईक किंवा विना सीट बेल्ट कार चालवताना दिसतात. अशाच एका विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा हेल्मेट घातले नाही म्हणून त्याला वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा जे घडले त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाहतूक नियम तपासणीदरम्यान घडलेली एक अनोखी घटना पाहायला मिळते. रस्त्यावर वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांचे हेल्मेट तपासत असताना एका तरुणाकडे हेल्मेट नसल्याचे आढळते. मात्र, दंड टाळण्यासाठी त्या तरुणाने वेगळीच युक्ती लढवली. त्याने लगेच मोबाईलवरून Blinkit या क्विक-कॉमर्स अॅपवर हेल्मेट ऑर्डर केले. काही मिनिटांतच डिलिव्हरी बॉय हेल्मेट घेऊन घटनास्थळी पोहोचला. यानंतर त्या तरुणाने रस्त्याच्या कडेलाच बॉक्स उघडून नवीन हेल्मेट बाहेर काढले आणि तत्काळ डोक्यावर घातले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या व्हिडिओवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला ‘देसी जुगाड’ म्हणत विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी या प्रकाराकडे नियमांबाबतची बेफिकिरी म्हणूनही पाहिले आहे. या घटनेचे नेमके ठिकाण आणि वेळ अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की,”सर्व भारतीय जुगाडू आहेत.” काही जण याला जुगाड म्हणत आहेत, तर काही जण तरुणांचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर, काही युझर्स विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.
