Swimming Pool Stunt Video: अनेक शहरांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत उष्णतेपासून आराम मिळविण्यासाठी लोक स्विमिंग पूल, रिसॉर्ट अशी ठिकाणी जाणे पसंत करतात. अशा ठिकाणी तरुण, तरुणी वा कुटुंबे उकाड्यापासून आराम मिळविण्यासाठी पाण्यामध्ये खेळताना दिसतात. मात्र, या मज्जा-मस्तीदरम्यान काही वेळा अशा काही धक्कादायक घटना घडतात; ज्याचा कोणी विचारही केला नसेल. अशाच प्रकारची एक मन सुन्न करणारी घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. एक तरुणाच्या स्टंटबाजीमुळे दुसऱ्या तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्विमिंग पूलमध्ये तरुण बुडतानाचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओद्वारे समोर आला आहे. त्यात तरुणाच्या मृत्यूची थरारक घटना पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, स्विमिंग पूलमध्ये एक तरुण जोरात धावत येत उडी मारत असताना त्याची लाथ त्या पुलामधून वर येणाऱ्या दुसऱ्या तरुणाच्या चेहऱ्यावर जोरात बसते; ज्यामुळे तो तरुण पाण्यात बुडतो. काही वेळाने त्या तरुणाला बाहेर काढले जाते; पण त्याचा मृत्यू होतो.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मृत्यूची थरारक घटना कैद

मध्य प्रदेशातील सैलाणा रोडवर असलेल्या डॉल्फिन जलतरण तलावात रविवारी दुपारी ही घटना घडली. हा मृत तरुण मित्रांसह स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दुर्घटना कैद झाली आहे. अनिकेत तिवारी (वय १८) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो पीयूष, हर्ष व तुषार या आपल्या तीन मित्रांसह डॉल्फिन जलतरण तलावावर गेला होता.

पैसे कमावण्यासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट जुगाड; रिक्षाला लावले लोहचुंबक अन्…; पाहा VIDEO

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंग व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अनिकेत स्विमिंग पूलमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी दुसरा एक तरुण धावत येत स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. त्यावेळी बाहेर पडणाऱ्या अनिकेतच्या चेहऱ्यावर त्या तरुणाचा पाय जोरात लागतो आणि तो स्विमिंग पूलमध्ये कोसळतो. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे तेथे उपस्थित असलेले अनिकेतचे इतर मित्र घाबरतात.

स्विमिंगमधील लाइफ गार्डच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू

यावेळी ते अनिकेतला स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतात. त्या मित्रांनी स्विमिंगच्या लाइफगार्ड (प्रशिक्षक) यांनाही त्याबाबत सांगितले; पण त्यांनी लक्ष दिले नाही. उलट हे लाइफ गार्ड स्विमिंग पूलच्या कठड्याजवळ फिरत आणि एकमेकांशी बोलत असल्याचं दिसून आलं आहे.

या घटनेवर अनिकेतचा मित्र पीयूष कुमावत म्हणाला, “आम्ही स्विमिंगमधील लाइफ गार्डला अनिकेतचा पूलमध्ये शोध घेण्यास सांगितले; पण ते बराच वेळ आले नाहीत. नंतर एक ट्रेनर आला; ज्याने अनिकेतचा शोध घेतला आणि त्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढले. यानंतर अनिकेत रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिकेतला सुमारे सहा मिनिटे २० सेकंदांनंतर स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्यात आले; ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.”

स्विमिंग पूलमधील लाइफ गार्ड आणि संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच अनिकेतचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे मित्र करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनीही या दुर्घटनेमधून निष्काळजीपणा समोर आल्याचे म्हणत चौकशीनंतर पूल ऑपरेटरवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी या घटनेनंतर हा स्विमिंग पूल सील केला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.