Gujrat Heart Attack Shocking video: मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये लेकाचा वाढदिवस आईच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरलाय. हल्ली हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे कारण आता हृदयविकाराचा झटका फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही तर तरुणही त्याला बळी पडू लागले आहेत.हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
ही घटना गुजरातच्या वलसाडमध्ये घडली आहे, यावेळी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने आईचा मृत्यू झाला. हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचा सर्वजण आनंद साजरा करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक डीजेवर नाचताना दिसत आहेत. यावेळी अचानक एक महिला स्टेजवरुन खाली कोसळते. अचानक महिलेने पतीच्या खांद्यावर डोके टेकवले आणि स्टेजवरुन त्या कोसळल्या. या धक्कादायक प्रकारानंतर पार्टीत घबराट पसरली.आजूबाजूच्या लोकांनी तिला तत्काळ मदत केली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबातील आनंदाचे वातावरण दुख:त बदलले.
अलीकडच्या काळात देशात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आजकाल, लोकांना चालता बोलता किंवा जिममध्ये व्यायाम करताना देखील हृदयविकाराचा झटका येतो. पूर्वी, हृदयविकाराचा झटका सामान्यतः ६०-६५ वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत होता, परंतु अलीकडे, ही समस्या २० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्येही दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Video viral: स्विमिंग पुलमधील मजामस्ती अंगलट; काही कळण्याआधीच तरुणाबरोबर घडलं भयंकर
सीपीआर म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका आल्यावर सीपीआर देतात म्हणजे नेमके काय? तर सीपीआरचा अर्थ कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. एखादी व्यक्ती आजारी पडली, तिची शुद्ध हरपली, ती श्वासोच्छवास करीत नाहीये किंवा श्वास मंदावला आहे, अशी कोणाचीही स्थिती उदभवल्यास सीपीआर दिला गेला पाहिजे. या उपचार प्रक्रियेद्वारे त्या व्यक्तीच्या फुप्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. छातीवर दाब देणे आणि तोंडाद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.