साधारणपणे ट्रेनमध्ये प्रवास करताना चहा-कॉफी, समोसे, बिस्किटे विकणारे लोक आपण प्रवास करीत असलेल्या डब्यातून जात-येत असल्याचे आपण पाहतो आणि त्याची आपल्याला सवय झालेली असते. पण, हल्ली ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारे लोकही मोठ्या आत्मविश्वासाने फिरताना दिसतात. “ओरिजिनल आहे”, “कंपनी पीस आहे”, “खूप स्वस्त देतो” अशा मोहमयी वाक्यांचा वापर करून प्रवाशांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. आतापर्यंत असे प्रकार जनरल डब्यातच दिसायचे. मात्र, आता थेट 2AC डब्यात iPhone 17 Pro Max विकला जात असल्याचा एक व्हिडीओ दिसून येत आहे आणि या व्हिडीओत जो खेळ उघड झाला आहे, तो पाहून कुणालाही धक्का बसेल.
हा व्हिडीओ एका ट्रेन प्रवासादरम्यानचा आहे. सेकंड एसी डब्यात एक तरुण वेगवेगळे महागडे मोबाईल फोन विकत असल्याचा दावा करतो. त्याच्याकडे विवोपासून ते थेट आयफोन १७ प्रो मॅक्सपर्यंतचे फोन असल्याचं तो सांगतो. विशेष म्हणजे आयफोन १७ ची किंमत अजून बाजारात कमी झालेली नाही. आणि “भाऊ, लेटेस्ट आहे” असं सांगत तो फोन विकायला तयार असतो.
व्हिडीओ शूट करणारा प्रवासी त्या फोनची तपासणी करायला घेतो आणि इथूनच सगळं प्रकरण उघड होतं. प्रवासी जेव्हा आयफोन १७ प्रो मॅक्स हातात घेतो, तेव्हा तो आधी कॅमेरा तपासतो. कॅमेरा बघता बघता ठीक वाटतो; पण खरी गंमत तेव्हा होते, जेव्हा तो फोन अनलॉक करून दाखवायला सांगतो.
फोन सुरू होताच लक्षात येतं की, तो फोन आधीच वापरलेला आहे. फोनमध्ये आधीच अॅप्स आहेत, सेटिंग्स आहेत आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फोन ट्रेनमधल्या वायफायला आधीपासूनच कनेक्ट झालेला असतो. म्हणजेच हा फोन अजिबात नवा नाही. तरीसुद्धा तो विक्रेता हा फोन फक्त २० हजार रुपयांना देतोय, असं सांगतो. एवढ्या कमी किमतीत आयफोन १७ प्रो मॅक्स मिळतोय म्हटल्यावर कुणालाही शंका येणारच.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @premverma7363 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडीओला ३० लाखांहून अधिक व्ह्युज आणि ७७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी विक्रेत्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका युजरने लिहिले, “स्क्रिप्ट तरी नीट लिहा. तुमचा लेटेस्ट फोन आधीच वायफायला जोडलेला आहे.” तर दुसऱ्याने म्हटले,“अभिनय जबरदस्त आहे; पण फसवणूक पकडली गेली.”
काही लोकांनी प्रवाशांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी थेट सांगितलं की, आयफोनसारखी महागडी वस्तू ट्रेनमध्ये कधीच खरेदी करू नये. ट्रेनमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मोहात पडणं धोकादायक ठरू शकतं. विशेषतः आयफोनसारख्या ब्रँडच्या बाबतीत नेहमीच अधिकृत आणि विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करणं सुरक्षित आहे. नाही तर स्वस्ताईचा मोह महागात पडू शकतो.
