चेन्नईच्या बीच स्थानकावर सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. लोकल ट्रेनचा (EMU) डबा रुळावरून घसरून प्लॅटफॉर्मवर चढला आणि एकच धावपळ उडाली. ट्रेनचा डबा प्लॅटफॉर्मवर येताच तिथे उपस्थित लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. रिकाम्या इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (EMU) यार्डमधून स्थानकात नेत असताना ही घटना घडली, अशी माहिती दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस. गुगनेसन यांनी दिली.

“शेड लाईनवरून प्लॅटफॉर्म १ वर रिकामा EMU रेक घेऊन जात असताना रेकने प्लॅटफॉर्मचे बफर एंड तोडले. त्यामुळे प्लॅटफॉर्म १ चे नुकसान झाले.”, असं एस. गुगनेसन यांनी सांगितलं. अपघातामागील कारण जाणून घेण्यासाठी योग्य स्तरावर तपास केला जाईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं. सुमारे ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर ईएमयूला अपघातस्थळावरून काढण्यात यश आले आहे. सध्या बीच पोलीस स्थानकात चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९ आणि रेल्वे कायद्याच्या कलम १५१, १५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने प्लॅटफॉर्मवर प्रवासी नसल्याने कुणालाही इजा झाली नाही. अपघातादरम्यान, शंटरने (दोन रेक जोडणारा किंवा काढणारा कर्मचारी) रेकवरून उडी मारली. त्याला किरकोळ दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अलीकडेच बिहारमधील सिवानमध्ये मोटरमनचा निष्काळजीपणा समोर आला. ट्रेन बिहारच्या सिवानला येत असताना त्याला चहाची तलप लागली. तेव्हा त्याने मध्येच ट्रेन थांबवली. ही घटना झाशी म्हणजेच ग्वाल्हेर मेल एक्सप्रेस ट्रेन क्रमांक-१११२३ मध्ये घडली. त्याने ९१ ए सिस्वान ढाल्याजवळ थांबवली. ट्रेन फाटकातच थांबल्याने वाहतूक कोंडी होत खोळंबा झाला. या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.