Train Fire Alarm Viral Video: रेल्वे प्रवास म्हटलं की, सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिलं जाणं अपेक्षित आहे. ट्रेनमध्ये केली गेलेली फायर अलार्मची व्यवस्था हा त्याच सुरक्षेचा एक भाग आहे. एका ट्रेनमध्ये याच फायर अलार्मचा मोठा आवाज घुमू लागला आणि क्षणात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. नेमकं काय झालंय, ट्रेनला खरंच आग लागली आहे का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. काही प्रवासी घाईघाईने आपल्या आसनांवरून उठून डब्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले. या संपूर्ण गोंधळाचा व्हिडीओ सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

सध्या सामाजिक माध्यमांवर रेल्वेतील एक व्हिडीओ वेगाने प्रसारित होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ट्रेन सुरू असताना अचानक आपत्कालीन अलार्म आणि फायर सायरन वाजू लागल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अलार्मचा आवाज इतका मोठा होता की, काही क्षणांतच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

काही प्रवाशांना नेमकं काय घडलंय हे समजण्यापूर्वीच त्यांनी डब्यातून बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू केली. कोणी आपलं सामान सावरण्याचा प्रयत्न करीत होतं, तर काही जण घाईघाईनं दरवाजाच्या दिशेनं जाताना दिसत होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ट्रेनमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.

याचदरम्यान डब्यात झोपलेली एक मुलगीही या गोंधळामुळे जागी झाली. दोन प्रवाशांनी घाईघाईनं तिला उठवत ‘चला-चला, ट्रेनला आग लागली आहे,’ असे सांगितले. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर असल्याचं प्रवाशांना वाटू लागलं.

मात्र, ट्रेनमध्ये आग लागलेली नसतानाही अलार्म का वाजला?

प्रवाशांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमागचं खरं कारण समोर आल्यानंतर मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. उपलब्ध माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार घडण्यामध्ये एका उंदरानं भूमिका बजावली असल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रेनच्या विद्युत पुरवठ्याच्या भागात किंवा जंक्शन बॉक्समध्ये एक उंदीर शिरल्याचं सांगितलं गेलं. तेथे असलेल्या विद्युत तारांमुळे अचानक ठिणगी उडाली. या घटनेत उंदीर तेथेच मृत झाला. विद्युत ठिणगी उडून उंदीर जळाल्यामुळे त्या भागात किंचित धूर निर्माण झाला.

याच धुरामुळे ट्रेनमधील स्वयंचलित अग्निसुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आणि डब्यातील फायर अलार्म एकाच वेळी वाजू लागले. अलार्मचा आवाज ऐकून प्रवाशांना मात्र ट्रेनमध्ये आग लागल्याचा संशय आला आणि काही क्षणांतच प्रवाशांना भीतीच्या पडछायेनं घेरलं.

सुरक्षेसाठी ट्रेन थांबवून तपासणी

फायर अलार्म वाजल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेन तातडीनं थांबवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर रेल्वेचं तांत्रिक पथक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डब्याची, तसेच विद्युत यंत्रणेची तपासणी केली.

तपासणीदरम्यान डब्यात कुठेही मोठी आग लागलेली नसल्याचं आढळलं. अलार्म सक्रिय होण्यामागे विद्युत ठिणगी आणि उंदरामुळे निर्माण झालेला धूर हे कारण असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना शांत केलं.

या संपूर्ण घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचं वृत्त नाही. परंतु, काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी सर्व प्रवासी सुरक्षित राहिले.

उंदरानं वाढवली हजारो प्रवाशांची धडधड?

या घटनेचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एका छोट्याशा उंदरामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये काही काळ घबराट निर्माण झाल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

व्हिडीओमध्ये अलार्मचा आवाज ऐकताच प्रवासी कशा प्रकारे घाबरले आणि डब्यातून बाहेर पडण्याची धडपड करू लागले, हे दिसत आहे. त्यामुळे हा प्रकार पाहणाऱ्या नेटकऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

हा व्हिडीओ tavishverse नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावरून प्रसारित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, या घटनेबाबत उपलब्ध माहिती आणि व्हिडीओमधील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे हा व्हिडीओ आणि त्यासोबत करण्यात आलेले दावे याच आधारावर ही बातमी देण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर अलार्म किंवा आपत्कालीन इशारा मिळाल्यास घाबरून न जाता, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

येथे पाहा व्हिडीओ