Train viral video: सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, यावेळी जो व्हिडीओ समोर आला आहे, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. रेल्वेच्या डब्यात एक माणूस अगदी निवांतपणे शॅम्पू लावून अंघोळ करताना दिसतोय. हे पाहून बाकीचे प्रवासी थक्क झाले, तर इंटरनेटवरचे लोक त्याच्या या ‘निर्लज्ज’, पण मजेशीर कृतीवर हसत आहेत. काहींना हा प्रकार खूप मनोरंजक वाटला; तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली.

हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात रेल्वे पूर्ण वेगात धावत असताना एक व्यक्ती टॉयलेटजवळील वॉश बेसिनजवळ उभी राहून स्वतःची अंघोळ करताना दिसते. रेल्वेच्या प्रवासात एखादा प्रवासी असं काही करेल, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही; पण या व्हिडीओनं ते खरं ठरवलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, त्या माणसानं एका छोट्या बादलीत पाणी भरलं आहे. हातातल्या ग्लासनं तो स्वतःवर पाणी टाकतो आणि थोड्याच वेळात शॅम्पूचं पाऊच फोडून डोक्यावर लावायला सुरुवात करतो. ट्रेन चालू असली तरी त्याला काही फरक पडत नाही, तो आरामात अंघोळ करीत राहतो. हे पाहून बाकीचे प्रवासी थक्क होतात. काही जण त्याचा व्हिडीओ काढू लागतात आणि काही सेकंदांतच तो सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओवर लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, “भाऊ ट्रेनमध्ये नाही; सलूनमध्ये बसला आहे वाटतं!” दुसऱ्यानं म्हटलं, “खूपच धाडसी लोक आहेत रे!” आणखी एकानं लिहिलं, “हे तर मार खाण्यासारखं काम आहे!” तर कुणीतरी मजेत लिहिलं, “जिथं पाणी मिळेल तिथंच अंघोळ करा, हाच खरा देशी अंदाज!” काही लोकांनी या व्हिडीओला “फ्री ट्रेन बाथ सर्व्हिस” असं म्हणत गंमत केली; तर काहींनी रेल्वे प्रशासनानं अशा प्रकारांवर नियम बनवावेत, अशी मागणी केली.


हा व्हिडीओ जरी मजेदार आणि हसवणारा असला तरी त्यातून एक गंभीर गोष्ट समोर येते. रेल्वेमधील स्वच्छता आणि शिस्त. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंघोळ करणे योग्य नाही. कारण- त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो आणि रेल्वेतील स्वच्छतेवरही परिणाम होतो. अशा वागणुकीमुळे लोकांचं लक्ष वेधलं जातं; पण ते चुकीचं उदाहरणही ठरतं. रेल्वे ही सगळ्यांची मालमत्ता आहे आणि तिथं शिस्त राखणं प्रत्येक प्रवाशाचं कर्तव्य आहे. तरीही, या व्हिडीओचा मजेशीर भाग आणि त्या व्यक्तीची बिनधास्त स्टाईल पाहून अनेक लोकांना हसू आवरलं नाही.