बिहारमधील पटना येथील दोन शिक्षिकांमध्ये झालेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अशा शिक्षकांकडून मुलांनी काय आदर्श घ्यायचा? असा प्रश्न विचारत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन शिक्षिका शाळेच्या आत आणि शेतात एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओत एका शिक्षिकेची आई तिला दुसऱ्या शिक्षिकेला मारहाण करण्यासाठी मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही घटना बिहटा ब्लॉक येथील एका शाळेतील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणावरुन दोन महिला शिक्षकांचा वर्गात वाद झाला. काही वेळात हा वाद इतक्या टोकाला गेला की, दोघींमध्ये चक्क हाणामारी सुरू झाली. बघता बघता दोघींनी शाळेला कुस्तीचा आखाडाच बनवलं. शिवाय या दोघी इतक्या जोरात हाणामारी करत होत्या त्या वर्गातून शेजारच्या शेतामध्ये कशा पोहचल्या त्यांचं त्यानाच समजलं नाही. शेतात पोहचल्यानंतरही या दोघी बराच वेळ एकमेकींना मारहाण करत होत्या. यादरम्यान एका महिला शिक्षिकेच्या आईने दुसऱ्या शिक्षिकेला चक्क चप्पलने मारहाण केल्याचं दिसत आहे. या महिला शिक्षकांची भांडण पाहण्यासाठी मोठा जमाव जमल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. दोन शिक्षिकांमधील भांडण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.




ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर नभेश कुमार यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी हे प्रकरण एका शाळेशी संबंधित असल्याचे सांगितले. प्रभारी मुख्याध्यापक व सहायक शिक्षक यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच याप्रकरणी दोन्ही महिला शिक्षकांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षकांमध्ये मारहाणीची ही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी याच जिल्ह्यातील एका शाळेतील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिला मुख्याध्यापकाला महिला शिक्षिकेने मारहाण केली होती. त्यामुळे शिक्षकच असे वागत असतील तर मुलांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.