Truck Pati Viral Video : भारतात ट्रक आणि त्यामागील वाक्य ही खूप व्हायरल होतात. अनेकदा या पाट्यांमधून भन्नाट सूचना दिल्या जातात. काही वेळा भावनिक मेसेज असतात, तर काही वेळा लोकांना समजेल अशा तिरकस भाषेत टोमणे लिहिले असतात. त्यामुळे ट्रकच्या मागे लिहिलेली वाक्ये नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. या पाट्या वाचून अनेकदा हसायला येतं तर काही पाट्यांवरील वाक्य अशी असतात जी तुमच्या आमच्या आयुष्याला रिलेट करणारी असतात. सध्या सोशल मीडियावर एका ट्रकमागची अशी पाटी व्हायरल होत आहे. पाटीवरील वाक्य वाचून प्रत्येक जण भावूक होत असून, “भावाने लाखात एक गोष्ट लिहिली आहे,” अशा प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या ट्रकच्या मागे अत्यंत मोजक्या पण तितक्याच मार्मिक शब्दांत लिहिले आहे: “परक्यांना दोष देऊन काय फायदा, आपल्यांनी काय तमाशा कमी केलाय होय….” हे एकच वाक्य माणसाला विचार करायला भाग पाडणारे आहे. आयुष्यात अनेकदा आपल्याला परक्यांपेक्षा आपल्याच माणसांकडून जास्त त्रास किंवा फसवणूक होते, हाच कटू अनुभव या ओळींमधून मांडण्यात आला आहे.
नेटकरी झाले भावूक
ट्रक मागील पाटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करताना स्वतःचे वैयक्तिक अनुभव कॅप्शनमध्ये लिहिले आहेत. एका युझरने लिहिले, “हे केवळ ट्रकवरचे वाक्य नाही, तर आजच्या जगाचे जीवघेणे सत्य आहे.” तर दुसऱ्याने कमेंट केली, “परके तर नावानेच परके असतात, पण जेव्हा आपलेच दगा देतात तेव्हा जास्त वेदना होतात.”
भारतात ट्रक पाठीमागील संस्कृती (Truck Art & Quotes) खूप जुनी आहे. अनेकदा ट्रक ड्रायव्हर्स आपल्या अवतीभवतीच्या जगाचा, नात्यांचा अनुभव या पाट्यांच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. याआधीही अनेक विनोदी वाक्ये व्हायरल झाली आहेत, पण हे विशिष्ट वाक्य थेट मानवी भावनांशी आणि नात्यांमधील दुराव्याशी जोडलेले असल्याने ते लोकांना खूप जास्त रिलेट होत आहे.
हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हजारो लोकांनी लाईक केला असून, त्यावर कमेंट्सचा पूर आला आहे. जर तुम्हीही कधी आपल्यांच्या वागण्याने दुखावला गेला असाल, तर हे वाक्य नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल.
तुम्हाला ट्रकमागचे हे वाक्य कसे वाटले? तुमच्या आयुष्याशी हे नाते जोडते का, आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा!
