काही दिवसांपासून देशात उन्हाचा तडाखा वाढला असून, या उष्णतेमुळे आग लागण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाहनांना उन्हाळ्यात आग लागण्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. उन्हाळा सुरू होताच कार, दुचाकी, तीनचाकींना आग लागण्याच्या घटना घडतात. अशा घटनांची माहिती आपल्याला कित्येकदा बातम्यांद्वारे मिळते. काही घटना तर आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या असतात. या वाहनांना वाचविण्याचे प्रयत्नही कित्येकदा निष्फळ ठरतात.

उन्हाळ्यात अनेकदा इलेक्ट्रिक कारला आग लागण्याच्या अशा घटना तुम्ही ऐकल्या असतील. बातम्यांतून तुम्ही तसे पाहिलेही असेल. काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरनाही आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. उष्णतेमुळे या दुचाकी, चारचाकी वाहनातील बॅटरीचे तापमान वाढते. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. कडक उन्हामुळे एसीला आग लागल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र, यावेळी आग एसीला लागलेली नसून इलेक्ट्रिक स्कूटरनी भरलेल्या ट्रकला लागली होती; ज्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आगीमुळे इलेक्ट्रिक स्कूटरविक्रेत्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

(हे ही वाचा : स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल; युजर्सच्या ‘अशा’ प्रतिक्रिया वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल )

इलेक्ट्रिक स्कूटरनी घेतला पेट

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इलेक्ट्रिक स्कूटरने भरलेल्या ट्रकला आग लागली आहे. ही वाहने ट्रकमध्ये दोन भागांत ठेवण्यात आली होती. ट्रकच्या वरच्या रॅकमध्ये ठेवलेल्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरना आग लागली आहे. सर्व स्कूटर जळत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या पार्श्वभूमीत एक व्हॉईस ओव्हरदेखील आहे; ज्यात एक व्यक्ती म्हणत आहे, “उष्णतेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरनी भरलेल्या ट्रकला आग लागली. त्यामुळे सर्व काही जळून खाक झाले. ट्रकमध्ये ठेवलेल्या वाहनांना आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. कोणाचीही आतील स्कूटर बाहेर काढण्याची हिंमत नव्हती. ट्रकच्या खालच्या रॅकमध्ये ठेवलेल्या इतर इलेक्ट्रिक स्कूटर बाहेर काढण्यासाठी प्रत्येक जण फायर ब्रिगेडची वाट पाहत आहे आणि व्हिडीओ बनवीत आहे.”

येथे पाहा व्हिडीओ

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा हा व्हिडीओ कधी आणि कुठे काढण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. @aryantyagivlogs नावाच्या पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि ८०८ जणांनी त्यावा लाईक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.